Loksabha election | बारामती मतदारसंघात अनेक तक्रारी दाखल! निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची माहिती | पुढारी

Loksabha election | बारामती मतदारसंघात अनेक तक्रारी दाखल! निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदासंघात मंगळवारी (दि.7) पार पडलेल्या मतदानावेळी दिवसभरात विविध प्रकारच्या 28 तक्रारी दाखल झाल्या. कार्यकर्त्यांना दमदाटी करणे, मतदान यंत्राची पूजा करणे, शिवीगाळ करणे, पैसे वाटप आदी प्रकारच्या तक्रारी असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (7 मे) मतदान पार पडले.

मतदानापूर्वी चाकणकर यांनी मतदान यंत्राची पूजा केल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांत प्रसारित झाले. यासंदर्भातील अनेकांनी प्रसारित झालेली छायाचित्रे समाजमाध्यमातून निवडणूक आयोग, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी द्विवेदी यांनी पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी चाकणकर यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

याबरोबरच इंदापूर येथील अंथर्णे गावात मतदान सुरू असलेल्या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी द्विवेदी यांनी दिली. भोर भागात पैसे वाटत असल्याची तक्रार प्राप्त झाली. तर पीडीसीसी बँकेच्या व्यवस्थापनावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवरून दिवसभरात 28 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार ) उमेदवार सुप्रिया सुळे यांचे वकील प्रांजल अग्रवाल यांनी ई-मेलवरून केल्या आहेत.

आम्हाला ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल. भोर विधानसभा मतदारसंघातील वेल्हा येथील पुणे जिल्हा बँकेची शाखा रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने संबंधित शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूरच्या लोकप्रतिनिधींचा असंसदीय भाषेतील चित्रफितीबाबत पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच मतदान यंत्राची पूजा केल्याच्या प्रकाराबाबतही पोलिसांना आदेश दिले.
– कविता द्विवेदी, बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी

विधानसभा मतदारसंघ आणि तक्रारी

इंदापूर- 2, बारामती-13, पुरंदर-3, भोर-2, खडकवासला-3, दौंड- 2 आणि इतर अशा मिळून एकूण 28 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button