loksabha election | मतदान केंद्र न सापल्याने गोंधळ; धायरी भागात भर उन्हात मतदारांचा उत्साह | पुढारी

loksabha election | मतदान केंद्र न सापल्याने गोंधळ; धायरी भागात भर उन्हात मतदारांचा उत्साह

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदानाच्या नियोजित वेळेच्या अगोदरपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा… मतदानासाठी ज्येष्ठांचा उत्साह… प्रशासनाची चोख व्यवस्था… तर काहींचे मतदान केंद्र सापडत नसल्याने उडालेला गोंधळ… ही स्थिती होती बारामती लोकसभा मतदानाप्रसंगी धायरी परिसरातील मतदान केंद्रावरील.बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या लढतीसाठी धायरी भागातील मतदार सकाळपासूनच बाहेर पडून उत्साहाने मतदान करत असल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्रांवर बघण्यास मिळत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदारांच्या रांगा व्यवस्थित करण्यापासून ज्येष्ठांना मदत करण्यासाठीही पोलिस पुढे येत होते. काही शाळांमध्ये स्काऊट गाइडच्या विद्यार्थिनींना मदतीसाठी ओळखपत्र दिली होती. मतदान केंद्र कुठं आहे, हे सांगण्यास त्या मदत करत होत्या.

वडगाव येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळपासूनच मोठी रांग होती, तर धायरीतील कै. वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे माध्यमिक विद्यालयात मतदानाच्या वेळेच्या अगोदरपासूनच मतदारांनी रांग लावली होती. साई शोभा स्कूलच्या मतदान केंद्रावरदेखील मतदारांची संख्या कमी असल्याने इतर केंद्रांच्या तुलनेत गर्दी कमी होती, तर चव्हाण शाळेतील केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा होत्या. भर उन्हातदेखील मतदारांचा उत्साह कायम होता. प्रशासनाकडून 85 वर्षांपुढील मतदारांसाठी घरून मतदान करण्याची व्यवस्था असूनदेखील मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यावर भर दिला. काका भोसले म्हणाले, मला त्यानिमित्ताने चालणे झाले आणि लोकशाहीच्या उत्साहामध्ये आमचादेखील सहभाग महत्त्वाचा. मी एकदाही मतदान चुकवलेले नाही. दरम्यान, काही मतदान केंद्रांवर जास्त भार आल्याने प्रशासनाने सहायक मतदान केंद्रे केली होती, त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडत होता. काहींना त्यांचे मतदान केंद्रच सापडत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. धायरी फाट्यावरील सणस विद्यालयात संजय कुलकर्णी या दिव्यांग मतदाराचे अगोदरच कुणीतरी मतदान केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘आपले’ मतदान करून घ्या…

उन्हाच्या कडाक्यामुळे मतदानावर परिणाम होईल असे बोलले जात होते. उन्हात मतदानाला जाण्याऐवजी ’आपले’ मतदान हे सकाळीच करून घ्या, अशा सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून देण्यात आल्याने धायरी परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र बघण्यास मिळाले.

मतदार यादीत घोळ

मतदान केंद्रावरील मतदार यादीत घोळ असल्याचे धनकवडी परिसरातील काही बुथवर आढळून आले. धनकवडी गावठाणात वास्तव्यास असलेल्या एका मतदाराचे पोस्ट ऑफिस समोरील संरक्षण लेखा सहकारी गृहरचनेच्या छत्रपती शिवाजी मंदिर हॉलमध्ये मतदान होते. बुथवरील कर्मचार्‍यांकडे असलेल्या मतदार यादीत त्यांच्या नावासमोर इतर व्यक्तीचा फोटो होता. ही बाब संबंधित मतदाराने लक्षात आणून दिली. त्यानंतर केंद्रावरील कर्मचार्‍यांनी पोलिंग एजंटला काही हस्तक्षेप आहे का ? असे विचारुन मतदान करुन घेतले. अनेक मतदारांचे छायाचित्र चुकल्याची माहिती संबंधित कर्मचार्‍यांनी दिली. तसेच, याच मतदान केंद्रावरील एका महिला मतदाराच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे दिसून आले. संबंधित महिलेने पुढे तक्रार नोंदविली का नाही, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

फूल दिसले नाही म्हणून मतदान नाही…

ईव्हीएम मशिनवर फूल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही, तर त्याला आम्ही काय करणार? कमळचे चिन्ह नाही, तर आम्ही कसे मतदान करायचे? असा संताप आजोबांनी धायरीमधील चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button