शास्त्रीनगर चौकामधील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा : पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ | पुढारी

शास्त्रीनगर चौकामधील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा : पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’

विश्रांतवाडी/येरवडा : शास्त्रीनगर येथे आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय स्मारक आहे. त्यामुळे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरला पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न मिळाल्याने पुढील प्रक्रिया रखडली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याने पुरातत्व विभागाने महापालिकेला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्याने उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगर रस्त्यावरील येरवडा ते वाघोलीदरम्यान होणार्‍या वाहतूक कोंडीने या रस्त्यावरून दररोज ये-जा करणारे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे नगर रस्त्यावरील शिरूर वाघोली हा दुमजली उड्डाणपूल रामवाडीपर्यंत आणावा, तसेच खराडी बायपास व शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर व्हावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून टिंगरे यांनी ही मागणी मान्य करून घेतली होती.

मात्र, शास्त्रीनगर चौकात आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय स्मारक असल्याने पुरातत्व विभागाकडून हिरवा कंदील मिळणे बंधनकारक होते. त्यासाठी आमदार टिंगरे यांनी पाठपुरावा केला होता. आता त्याला यश आले आहे. सर्व प्रक्रिया पार पडून 2 मे रोजी महापालिकेला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाल्याने शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी साडेचार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. शिरूर – वाघोली उड्डाणपूल रामवाडीपर्यंत आणण्यात यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी या भागातील बीआरटी काढली. पुरातत्व विभागाने परवानगी दिल्याने शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचा मार्ग मोकळा झाला आहे.

-सुनील टिंगरे, आमदार.

हेही वाचा

Back to top button