Crime news : कोरेगाव भीमा येथे शिक्षिकेचे नऊ तोळ्यांचे दागिने लांबविले.. | पुढारी

Crime news : कोरेगाव भीमा येथे शिक्षिकेचे नऊ तोळ्यांचे दागिने लांबविले..

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : लग्नाहून परतताना एका शिक्षिकेचे तब्बल नऊ तोळे वजनाचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 1 मे) कोरेगाव भीमा येथे पुणे-नगर महामार्गावर घडली. याबाबत अरुणा दिलीप पवार (वय 39, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणा पवार ह्या बुधवारी (दि. 1 मे) लग्नसोहळा आटोपून पती व मुलांसह दुचाकीवरून (एमएच 12 टीएफ 6913) घरी येत होत्या. कोरेगाव भीमा येथील पेट्रोल पंपासमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका युवकाने पवार यांच्या गळ्यातील दागिने हिसकावत त्यांना रस्त्यावर पाडले. तसेच त्यांच्या गळ्यातील तब्बल नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून ते दोघेही दुचाकीवरून शिक्रापूरच्या दिशेने पळून गेले. या वेळी अरुणा पवार जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button