भिगवण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : अजित पवार | पुढारी

भिगवण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : अजित पवार

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : भिगवण व परिसरातील शेतीच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तलाव, बुडीत बंधारे पाणी प्रश्न, मच्छीमार प्रश्न यांसह इतर प्रश्न सोडवायचे असतील, तर ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करून आम्ही सर्वजण परिसराचा विकास व कायापालट करण्यासाठी एकत्र आलो आहे. मात्र, काहींना आमच्यात कुरघोड्या करायच्या असल्याने ते नाराज आहेत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भिगवण येथे घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,आमदार दत्तात्रय भरणे,यशवंत माने,माजी मंत्री सदाभाऊ खोत,अंकिता पाटील आदीजण उपस्थित होते.

पवार म्हणाले की, या भागात पर्यटन विकासाल वाव आहे, त्याकरिता हर्षवर्धन भाऊ व भरणे मामांनी पाठपुरावा करण्याची विनंती केली. रेल्वेच्या थांब्याबाबत आपण केंद्रीय मंत्र्यांशी बोलून प्रश्न निकाली काढू,आचारसंहिता संपल्यावर येथील बसस्थानक दुरुस्ती किंवा नव्याने उभारणी करण्यात येईल, जेणेकरून रात्री-अपरात्री महिलांना सुरक्षित वाटेल. या भागातील मदनवाडी,पोंधवडी आदी तलाव वरदान असले, तरी सतत तहानलेले असतात. त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे. या भागात बुडीत बंधारे उभारण्यात येतील तसेच भोई समाजाचा रोजगार लक्षात घेऊन उजनीत मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षी हे बीज उशिरा सुटले असले, तरी चालू वर्षी त्याचे नियोजन करून मत्स्यबीज सोडले जाईल.

हेही वाचा

Back to top button