वन्यजीवांना नैसर्गिक पाणवठ्यांचा आधार; सिंहगडच्या जंगलातील चित्र | पुढारी

वन्यजीवांना नैसर्गिक पाणवठ्यांचा आधार; सिंहगडच्या जंगलातील चित्र

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपये खर्चून बांधलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडत आहेत, तर दुसरीकडे सिंहगडच्या जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांत कडकडीत उन्हाळ्यातही मुबलक पाणी आहे. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांवर दुर्मीळ वन्यप्राणी, पक्ष्यांसह हजारो वन्यजीव तहान भागवत आहे. वन विभागाने केलेल्या पाहणीत नैसर्गिक पाणवठ्यांवर मोठ्या संख्येने वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असल्याचे चित्र पुढे आले आहे. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील तळई उद्यानाच्या खालच्या बाजूला असलेल्या अतकरवाडीजवळील डोंगरकपारीतील एकटावणे नैसर्गिक पाणवठ्यात कडकडीत उन्हाळ्यातही मुबलक पाणी आहे.

खडकात नैसर्गिक प्रवाहामुळे खोल खड्डा पडला आहे. त्यात मुबलक पाणी आहे. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बाळासाहेब वाईकर, संदीप कोळी, सुरक्षारक्षक नितीन गोळे आदींनी नुकतीच या पाणवठ्याची सफाई केली. सिंहगडापासून पानशेत, वरसगाव ते रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत वन विभागाचे घनदाट जंगल पसरले आहे. सिंहगडच्या जंगलात वन्यजीवांची संख्या प्रचंड आहे.

या ठिकाणी आहेत नैसर्गिक पाणवठे

सिंहगडाच्या पायथ्याला सांबरेवाडी येथील जांभळीचा दरा, पाच पांडव कडा, डोणजे येथील सीताबाईचा दरा, पढेर मेटावरील पाणवठा, दुरुपदरा येथील भवानी कडा आदी ठिकाणी नैसर्गिक पाणवठे असून, या ठिकाणी मोठ्या संख्येने वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत आहेत. गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे डोंगरकड्यातील नैसर्गिक पाणवठ्यांत पुन्हा पाणी साठले आहे. यंदा तीव— उन्हाळा असतानाही सिंहगडच्या जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले नाहीत.

नैसर्गिक पाणवठ्यांवर बिबटे, हरीण, चिंकारा, मोर आदी वन्यजीव मोठ्या संख्येने पाणी पिण्यासाठी येतात. वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्या विष्ठा या ठिकाणी दिसतात. कृत्रिम पाणवठ्यांवर या तुलनेत कमी वन्यप्राणी पाण्यासाठी येतात.

– संदीप कोळी, वनरक्षक

हेही वाचा

Back to top button