Loksabha Election | लेकीसाठी प्रतिभा पवार प्रथमच निवडणुकीच्या मैदानात | पुढारी

Loksabha Election | लेकीसाठी प्रतिभा पवार प्रथमच निवडणुकीच्या मैदानात

बारामती : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी (दि. 3) बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या आई प्रतिभा पवार यांनी हजेरी लावली. प्रतिभा पवार ह्या आजवर फक्त सांगता सभेतच उपस्थितांमध्ये बारामतीकरांना दिसायच्या. शुक्रवारी मात्र त्यांनी लेकीसाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उपस्थितांना अभिवादन केले.
बारामतीच्या मिशन बंगल्याच्या मैदानावर आजवर पवार कुटुंबीय प्रचाराची सांगता सभा घेत आले आहे.

यापूर्वी पक्ष एकसंध असताना झालेल्या प्रत्येक सभेला प्रतिभा पवार यांच्यासह कुटुंबातील सर्व महिला उपस्थित राहत होत्या. परंतु, त्या उपस्थितांमध्ये बसायच्या. शुक्रवारच्या मेळाव्यात प्रतिभा पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, शुभांगी पवार, कुंती पवार, सई पवार, रोहित पवार, रेवती सुळे यांच्यासह विद्या चव्हाण, निर्मला सावंत, सक्षणा सलगर, पौणिमा तावरे, वनिता बनकर, विकास लवांडे, शिवरत्न शेटे यांची उपस्थिती होती. प्रतिभा पवार यांचा महिलांकडून सन्मान करण्यात आला. त्यांनी भाषण केले नाही. परंतु, उपस्थितांना हात जोडून अभिवादन केले.

नणदेची जागा घेणार नाही, सुळेंचा डीएनए पवारांचाच : शर्मिला पवार

अजित पवार यांच्या सख्ख्या भावजय शर्मिला पवार यांनी त्यांच्या भाषणात, ममी नणदेची जागा कधीही घेणार नाही. आम्ही बाहेरच्याच आहोत. मूळ पवारांचा जो डीएनए आहे, तो सुप्रिया सुळे यांच्यातच आहे. त्यामुळे यासंबंधी जे वाक्य वापरले गेले, ते चुकीचे नाही, असे स्पष्ट केले. आता त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर अजित पवार काय उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आईबद्दल बोलाल, तर करारा जवाब देईन : सुळेंचा अजित पवारांना इशारा

मी गेल्या आठ महिन्यांपासून गप्प आहे. म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही, हा गैरसमज ठेवू नये. रोहितच्या आईबद्दल एकवेळ बोलला, गप्प बसलो. माझ्यावर, माझ्या वडिलांवर बोलला, गप्प बसलो. पण, माझ्या आईबद्दल बोलाल, तर करारा जवाब देईन, असा इशारा या वेळी सुप्रिया सुळे यांनी दिला. त्या म्हणाल्या की, नाती जपायची असतात. ती तुटायला काहीवेळ पुरेसा असतो. रोहितच्या आईंबद्दल बोललात, ठीक आहे, माझ्या मनगटात जी ताकद आहे, ती आजी शारदाबाईंच्या बांगड्यांची आहे, हे विसरू नका. विकास काही कोणी किंवा मी स्वतःच्या खिशातून करीत नाही. त्यामुळे मी विकास केला नाही, आम्ही मिळून विकास केल्याचा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा

Back to top button