सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल 20 मेनंतर | पुढारी

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल 20 मेनंतर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाज माध्यमात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने निकालाच्या संभाव्य तारखेबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल 20 मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशभरातून 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे. त्यात बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च यादरम्यान घेण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये निकालाची तारीख नमूद केलेली बनावट परिपत्रके फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे समाज माध्यमात फिरत असलेल्या निकालाच्या बनावट तारखांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अधिकृत संकेतस्थळाद्वारे संदेश प्रसारित केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल 20 मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट तारखांमुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा

Back to top button