मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात तिसर्या टप्प्यासाठी 7 मे रोजी कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आदी 11 लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या 11 मतदारसंघांत एकूण 2 कोटी 9 लाख 92 हजार 616 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 258 उमेदवारांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. हे मतदार मतदान करून कोणाला दिल्लीला पाठवणार, याचा निर्णय 4 जून रोजी मतदान यंत्रांतून बाहेर येणार आहे.
तिसर्या टप्प्यात कोकण विभागातील 2 (रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग), पुणे विभागातील 7 (बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले) व छ. संभाजीनगर विभागातील 2 (धाराशिव आणि लातूर) अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण 23 हजार 36 मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या 11 मतदारसंघांत बारामती (38), माढा (32), धाराशिव (31) येथे सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. 11 मतदारसंघांपैकी बारामती मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. बारामतीमध्ये पुरुषांची संख्या 12 लाख 41 हजार 945, तर महिला मतदारांची संख्या 11 लाख 30 हजार 607 इतकी आहे. 114 मतदान केंद्रे संवेदनशील असून, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग तसेच पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.