खर्चाचा हिशोब न दिल्यास कारवाई : निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगलांचा इशारा! | पुढारी

खर्चाचा हिशोब न दिल्यास कारवाई : निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगलांचा इशारा!

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक उमदेवारांनी निवडणूक खर्च देणे बंधनकारक आहे. दररोजचा हिशोब आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खर्च व्यवस्थापन कक्षाकडे सादर न केल्यास कारवाई केली जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सोमवारी (दि.29) सांगितले. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाची तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली शुक्रवारी (दि.3) केली जाणार आहे.

दुसरी तपासणी 7 मे रोजी आणि तिसरी तपासणी 11 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा. निवडणूक कामकाजाकरिता उमेदवाराने दररोज केलेल्या खर्चाचा तपशील, बँक पासबुक व सर्व देयकांच्या मूळ पावत्यांसह खर्च सादर करावा, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

तपासणी दिनांकादिवशी उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे. तपासणी वेळी दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत नोंदवून तपासणीसाठी सादर करावी. आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. तपासणी दिनांकादिवशी गैरहजर राहिल्यास किंवा खर्चामध्ये तफावत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सिंगला यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी आयोजित केलेल्या सभा, मेळावे, बैठका, प्रचार फेर्या, कार्यक्रम आदींवर निवडणूक विभाग लक्ष ठेवून आहे. निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघात कार्यरत आहेत.

उमेदवारांना 95 लाखांपर्यंत खर्च करता येणार

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 95 लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण 33 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे व खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणार्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड किंवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. खर्च तपासणी पथकप्रमुख अश्विनी मुसळे आणि त्यांच्या पथकाकडून हे काम केले जात आहे. सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून सविता नलावडे या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिंगला यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button