सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील परतले घरी; फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत | पुढारी

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील परतले घरी; फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

मंचर : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला व हाताला मार लागला होता. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. 29) मंचर येथील निवासस्थानी आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके वाजवत जंगी स्वागत केले. या वेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रतापराव वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुषमा शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महिनाभरापूर्वी सहकारमंत्री वळसे पाटील त्यांच्या पुण्यातील घरात पाय घसरून पडले होते. त्यांच्या खुब्याला, हाताला व पायाला दुखापत झाली होती. हात फॅक्चर झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर ते त्यांच्या मंचर येथील निवासस्थानी सोमवारी सायंकाळी सहा वाजता आले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत त्यांचे जंगी स्वागत केले, तर महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. वळसे पाटील लवकरच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीसह महायुतीत उत्साहाचे वातावरण

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वळसे पाटील जायबंदी झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळजी व्यक्त करत होते. मात्र, आता ते प्रचारात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राष्ट्रवादीसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वळसे पाटील सध्या प्रचारात सक्रिय नसले तरी त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. याबाबत वळसे पाटील वेळोवेळी कार्यकर्त्यांशी व नेत्यांसोबत संपर्क साधून माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button