‘मोदींची गॅरंटी, अजितदादांचा वादा’ यावर मतदारांचा विश्वास : सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

‘मोदींची गॅरंटी, अजितदादांचा वादा’ यावर मतदारांचा विश्वास : सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘संपूर्ण देशात होणारा विकास दिसत असताना तो नाकारत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याविरोधात रोज शिव्यांचा रतीब घालणार्‍यांचा बारामतीकरांना उबग आला आहे. देशात मोदींची सत्ता असताना बारामतीचा खासदार मात्र मोदींच्या बाजूचा नाही, याची सल मतदारांच्या मनात आहे. अजितदादांचा वादा आणि मोदींची गॅरंटी, यावर मतदारांचा विश्वास आहे,’ असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती या मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी
(दि. 29) पुण्यातील रेस कोर्स मैदानावर झालेल्या सभेस संबोधित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे चारही उमेदवार मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव आणि सुनेत्रा पवार या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विराट जनसमुदायासमोर सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या छोटेखानी मनोगतास पंतप्रधान मोदींनीही दाद दिली.

पवार म्हणाल्या की, देशाच्या विकासगंगेत संपूर्ण महाराष्ट्रही सहभागी झाला पाहिजे, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतला. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. पण, प्रचारादरम्यान जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मी मोदीजींना सांगू इच्छिते की, या वेळेस बारामती लोकसभा मतदारसंघ मोदींच्या सोबत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार या वेळेस परिवर्तन घडविणार आहेत. हे परिवर्तन म्हणजे मोदींच्या विरोधातील खासदाराला घरी बसवणार आहे.

पवार म्हणाल्या, भावनेच्या, सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न काहींनी चालविला आहे. मात्र, गेल्या 15 वर्षांत मतदारसंघात झालेली विकासकामे कोणामुळे झाली आहेत आणि रखडलेल्या विकासाला कोण कारणीभूत आहे, हे मतदारांनी ओळखले आहे. केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अजित पवार यांनी मतदारसंघात विकासकामे आणली. मात्र, केंद्रातून कामे करून घेण्यात खासदार कमी पडले, याविषयी मतदारांच्या मनात शंका नाही.

एखाद्या नेत्यावर जेव्हा संपूर्ण देशवासीय प्रेम करतात तेव्हा त्यांना पराभूत करण्याची ताकद कोणत्याच विरोधकांमध्ये नसते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, देशवासीयांचे हे प्रेम नरेंद्र मोदींनी कमविलेले आहे. हे प्रेम त्यांनी गेली दहा वर्षे केलेल्या कामातून कमविले आहे. मोदींच्या नेतृत्वात आपले भवितव्य सुरक्षित आहे, याचा अनुभव देश घेत आहे. महिला, युवक, शेतकरी, दीनदलित आदींसाठी संवेदनशीलतेने त्यांनी योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर मध्यमवर्गालाही दिलासा दिला आहे. दहशतवाद्यांना भारतात हल्ले करण्याची आज हिंमत होत नाही. पाकिस्तानही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नसल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button