अजब कारभार! दोनशे मीटर रस्त्याच्या कामाला दोन वर्षांचा विलंब | पुढारी

अजब कारभार! दोनशे मीटर रस्त्याच्या कामाला दोन वर्षांचा विलंब

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडीतील भगली हॉस्पिटल जवळील गुरुराज सोसायटी ते सातारा रस्त्यादरम्यान ओढ्यावर पूल बांधणे व काँक्रिटीकरण करण्याचे काम दीड वर्षे होऊन गेले तरीही रखडलेलेच आहे. त्यामुळे नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेकवेळा या रस्त्यावर पादचारी, दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याने नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आणखी किती दिवस हे काम रेंगाळणार आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

बिबवेवाडीतील भगली हॉस्पिटल चौकापासून सातारा रस्त्याकडे गुरुराज सोसायटीमधून जाणर्‍या रस्त्याचे काम ऑक्टोबर 2022 मध्ये मंजूर झाले होते. यामध्ये सोसायटीच्या भागातून वीस मीटर रुंद व 150 मीटर लांब असलेल्या डीपी रस्त्याचे कामकाज मार्च 2023 मध्ये सुरू झाले होते. मात्र, तत्कालीन ठेकेदाराने या कामांमध्ये बांधकाम नियमांतील त्रुटी व चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे ठेकेदारांनी हे काम अर्धवटच सोडून दिले. त्यातच अर्धवट झालेल्या रस्त्यावरून गुरुराज सोसायटी सातारा रस्ता ते भगली हॉस्पिटल चौकाकडे जाणार्‍या बेकायदेशीर दुचाकी वाहन चालकांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने सोसायटीतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट रस्त्यामुळे अनेक वाहने घसरून पडत आहेत.

त्यामुळे मोठमोठे अपघातही झाले आहेत. याबाबत सोसायटीच्या अध्यक्षासह पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेट घेतली, तेव्हा या भागात नवीन ठेकेदार येणार आहे, असे सांगण्यात आले. नवीन ठेकेदारांनी ही जुन्या ठेकेदाराप्रमाणेच अर्धवट कामे केलीली आहेत, याचा त्रास सर्वांनाच होत आहे. सोसायटीतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन सध्या वावरावे लागत आहे. आणखीन मोठा अपघात घडण्याची महापालिका प्रशासन वाट पाहत आहे का, व या परिसरात राहणार्‍या आबालवृद्धाच्या सुरक्षितते संदर्भात महापालिका इतकी निष्ठुर झाली काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. महापालिका अधिकार्‍यांशी याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सुटीच्या दिवशी फोन उचलण्यात टाळाटाळ केली.

हेही वाचा

Back to top button