पुढे साफसफाई, मागे कचऱ्याचे ढीग! कोंढवे धावडे परिसरातील चित्र | पुढारी

पुढे साफसफाई, मागे कचऱ्याचे ढीग! कोंढवे धावडे परिसरातील चित्र

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावरील कोंढवे धावडे, उत्तमनगर-शिवणे परिसरातील ओढ्या, नाल्यांच्या सफाईचे काम महापालिकेने सध्या सुरू केले आहे. कोंढवे धावडे येथे एकीकडे ओढ्याची साफसफाई सुरू आहे, तर दुसरीकडे साफसफाई केलेल्या जागेवर पुन्हा कचर्‍याचे ढीग साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरातील ओढे-नाले आधीच अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहेत, तर दुसरीकडे कचरा आणि राडारोडा टाकला जात असल्याने ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक पात्रे बुजत चालली आहेत. जोरदार पावस झाल्यानंतर ओढ्या-नाल्यांतील पाणी थेट नागरी वस्त्यांत शिरत असून, रस्ते व पूलही पाण्याखाली बुडत आहे.

ओढ्यांत व नाल्यांत कचरा फेकणार्‍या बेशिस्त नागरिकांवर कोणाताही अंकुश नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. परिसरात तीन किलोमीटर लांबीचे ओढे आहेत. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी धो धो वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांना सध्या गटारांचे स्वरूप आले आहे. महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी परिसरातील ओढ्या-नाल्यांची सफाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नाल्यांच्या परिसरात दलदल वाढल्याने दुर्गंधी आणि डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याकडे माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, कोंढवे धावडेचे माजी उपसरपंच अतुल धावडे आदींनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अनिता इंगळे म्हणाल्या, पूरपरिस्थिती निर्माण होणार्‍या ठिकाणी ओढ्याचे खोलीकरण करण्यात यावे. परिसरातील सर्व ओढे, नाले थेट मुठा नदीला जोडले आहेत. खडकवासलातून जादा पाणी सोडल्यानंतर नाल्यांच्या तीरावर पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे ओढ्यांची वरवर सफाई न करता नैसर्गिक पात्र मोकळे करून पाणी वाहून जाण्यासाठी त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे.

एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे ते शिवणे या परिसरातील ओढ्या-नाल्यांची सफाई केली जाणार आहे. सध्या कोंढवे धावडे परिसरातील नाल्यांची सफाई सुरू आहे. दलदल, दुर्गंधीत जेसीबी मशिनने सफाई केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी सफाई केलेल्या नाल्यात नागरिक पुन्हा कचरा टाकत आहेत. याबाबत वारजे क्षेत्रीय कार्यालयाला पत्र दिले जाणार आहे.

-एन. एम. थोपटे, उपविभागीय अभियंता, नाला सफाई विभाग

नागरिकांनी ओढे व नाल्यांत कचरा, राडारोडा टाकू नये यासाठी सोसायट्या, लोकवस्त्यांत जनजागृती केली जात आहे. मात्र, तरीदेखील नाल्यांत कचरा टाकला जात आहे. त्यास प्रतिबंध करण्यासाठी नाल्यांच्या दोन्ही बाजूला तारेचे कुंपण घालणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित विभागाला लवकरच कळविण्यात येणार आहे.

-राजेश आहेर, आरोग्य निरीक्षक, कोंढवे धावडे विभाग

हेही वाचा

Back to top button