अजित पवारांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; निवडणूक अधिकार्‍यांनी बजावली नोटीस | पुढारी

अजित पवारांना 'ते' वक्तव्य भोवणार; निवडणूक अधिकार्‍यांनी बजावली नोटीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता घेईन,’ असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्याबाबत निवडणूक अधिकार्‍यांनी नोटीस पाठवली आहे. तत्काळ वक्तव्याचा खुलासा करण्यात यावा, अशा सूचना देखील करण्यात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
इंदापूर येथे 17 एप्रिल रोजी वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवार बोलले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शासकीय आमिष दाखविणारे राजकीय नेत्यांनी वक्तव्य केल्यास आचारसंहितेचा भंग समजला जातो. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तातडीने नोटीस काढण्यात येते. त्यानुसार निवडणूक अधिकार्‍यांनी नोटीस काढलेली आहे. ही नोटीस अजित पवार यांच्या कार्यालयात अजित पवार यांच्या नावे देण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. निवडणुकीत सहभागी होणार्‍या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणार्‍या उमेदवाराला निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल, तर गुन्हा दाखल केला जातो.

हेही वाचा

Back to top button