शहर बनले घरफोड्यांचा अड्डा! सव्वातीन वर्षांत तब्बल 1770 घरफोड्या | पुढारी

शहर बनले घरफोड्यांचा अड्डा! सव्वातीन वर्षांत तब्बल 1770 घरफोड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. त्यातच किरकोळ चोर्‍या, घरफोड्यांमुळे नागरिकांना घर बंद करून बाहेर पडणे अवघड झाले आहे. चोरटे पाळत ठेवून नागरिकांच्या घरावर डल्ला मारत आहेत. पुणे शहर हे चोरट्यांसाठी घरफोड्यांचे आगार बनले आहे. चोरटे येतात, शहरातील बंद फ्लॅटची पाहणी करतात आणि घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करतात, अशीच काहीशी परिस्थिती शहराची झाली आहे. 33 पोलिस ठाणी, गुन्हे शाखेची विविध पथके दिमतीला असतानाही चोरांवर पोलिसांचा अंकुशच राहिला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील सव्वातीन वर्षांत 1770 घरफोड्या करून चोरट्यांनी तब्बल 49 कोटी 23 लाखांचा ऐवज चोरून नेला.

यात केवळ 8 ते 9 कोटींचाच मुद्देमाल पोलिसांना परत मिळवता आला आहे. घरफोडी झाल्यानंतर नागरिकांना त्यांचा गेलेला मुद्देमाल परत मिळेल का? याची शाश्वतीच राहिली नाही. घरफोडीच्या घटना वर्षाला वाढत आहेत. मात्र, गुन्ह्यांची उकल पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. चालू वर्षात केवळ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल 123 बंद सदनिका चोरट्यांनी लक्ष्य करून सव्वादोन कोटींचा ऐवज चोरून नेला. एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होत असताना दुसरीकडे घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांना घर सोडून जाणे

जिकिरीचे झाले आहे. शहरात चोरटे येऊन बिंधास्त घरफोड्या करत आहेत. परंतु, पोलिसांना अद्यापही या घरफोड्या करणार्‍या चोरट्यांवर म्हणावा तसा उपाय काढता आलेला नाही. काही वेळा गुन्ह्यात अटक झाल्यानंतर चोरटे तत्काळ जामीन घेऊन बाहेर येतात आणि पुन्हा त्यांचा घरफोड्यांचा, चोर्‍यांचा उद्योग सुरू ठेवतात. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके या चोरट्यांवर करडी नजर ठेवून आहेत.चोरट्यांकडून विविध शक्कल लढवली जात आहे. त्यामुळे शहरात वारंवार होणार्‍या चोर्‍या आणि घरफोड्या थांबणार कधी? असा सवाल पुणेकर नागरिक उपस्थित करत आहेत.

चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

शहरात दररोज घडणार्‍या घरफोड्यांच्या घटनांमुळे पुणेकरांची झोप उडाली आहे. घराबाहेर पडल्यास घर सुरक्षित राहिले नाही. चोरटे रात्री व भरदिवसा घरफोड्या करून सामान्य नागरिकांनी जमा केलेल्या कमाईवर हात साफ करत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करा आणि शहरातील हे घरफोड्यांचे सत्र थांबवा, अशी मागणी सर्वसामान्य पुणेकर नागरिक करत आहेत.

सीसीटीव्हींचे जाळे तरी चोरटे अ‍ॅक्टिव्हच

शहरात सीसीटीव्हींचे जाळे असतानादेखील चोरटे नित्यनियमाने त्यांचे काम पार पाडत घरफोड्या, चोर्‍या करत आहेत. तरीही पोलिसांना घरफोडी व वाहनचोरीतील गुन्हेगार शोधता येत नसल्याचे वास्तव आहे. घरफोड्यांबरोबरच शहरात वाहनचोरी, मोबाईलचोरी, बसमध्ये नागरिकांना लुटणे, सोनसाखळी आणि इतर चोर्‍या सुरूच आहेत.

हेही वाचा

Back to top button