Loksabha election : विमानतळाअभावी विकास ठप्प; उद्योग जगतातून नाराजी व्यक्त | पुढारी

Loksabha election : विमानतळाअभावी विकास ठप्प; उद्योग जगतातून नाराजी व्यक्त

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : सरकारला वर्षाला तब्बल 40 हजार कोटींचा कर देणारी चाकण औद्योगिक वसाहतीसह तळेगाव, शिक्रापूर, रांजणगाव या औद्योगिक वसाहती पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, माण आयटी पार्क, नाशिक, नगरपासून जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे काळाची गरज आहे. विमानतळाशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास ठप्प झाला आहे. लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, याची फार मोठी किंमत सध्या उद्योग जगताला मोजावी लागत आहे.

लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापले असताना उमेदवारांकडून केवळ अभासी प्रचार सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पूर्वीचीच लढाई होत आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अशीच लढत होत आहे. सध्या उमेदवारांकडून विकासावर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. केवळ वैयक्तिक टीका-टिप्पणी व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. यामुळे मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चाकण, खेड, तळेगाव, शिक्रापूर, रांजणगाव, पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतील गुंतवणूकदार, उद्योजक यांच्याकडून या परिसरासाठी विमानतळाची मागणी केली जात असताना या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाची धोरणे उद्योगांसाठी मारक असून, लाखो कोटींची गुंतवणूक करणा-या औद्योगिक वसाहतींना वार्‍यावर सोडले जात असल्याची भावना येथील इंडस्ट्रियल असोसिएशनने दै.’पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

देशात, राज्यात विमानतळ विकसित केले जात असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील या प्रश्नांकडे, मागण्यांकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. येथील लोकप्रतिनिधी, राज्यकत्र्यांना उद्योगाचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. चाकण, रांजणगाव, तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीसाठी किमान कार्गो हब तरी करा, या उद्योजकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करताना शासनाकडून तुम्हाला विमानतळ देऊ, चांगले रस्ते देऊ अशी अनेक स्वप्नं दाखवली, पण आता शासनाने औद्योगिक वसाहतीला वार्‍यावर सोडल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली. दिल्ली- मुंबई औद्योगिक क्षेत्राचा भाग म्हणून चाकण येथे पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ करणे हा एक पूर्व नियोजित आराखडाच होता. खेड तालुक्यातील तीन -चार जागांची यासाठी तपासणी करण्यात आली. यात एक-दोन जागा अंतिम करण्यापर्यंत पुढे गेल्या. परंतु प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व मूठभर लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी चाकणचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविण्यात आले.

राज्यात कोणतेही सरकार असो, कोणीही उद्योजकांच्या मागण्यांकडे लक्ष देताना दिसत नाही. पुरंदर, बारामतीचे विमानतळ चाकण, रांजणगाव, तळेगावमधील उद्योगांसाठी काही उपयोगाचे नाही. गुंतवणूक करताना शासनाकडून अनेक स्वप्नं दाखवली जातात, परंतु कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. हजारो रोजगार, कोट्यवधींचा कर देणा-या इंडस्ट्रीकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाच्या धोरणांवर उद्योजक प्रचंड नाराज आहेत. चाकण परिसरात विमानतळ, किमान कार्गो हब झाले नाही तर भविष्यात येथील अनेक कंपन्या बाहेर जातील अन् विकास ठप्प होईल.

– दिलीप बटवाल सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्री

हिंजवडी आयटी पार्कने तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे. पण, मूलभूत सोयी-सुविधा मिळवण्यासाठी सतत झगडावे लागते. आयटी पार्कमधील आमचे ग्राहक, कर्मचारी यांना सतत यूएस, युके सारख्या देशांमध्ये प्रवास करावा लागतो. पण, येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मुंबईहून फ्लाईट घ्यायची तर तीन-चार तास मुंबई- नाशिक हमरस्त्यावर अडकून पडावे लागते. थेट फ्लाईटची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ कराल तेव्हा करा, पण सध्याच्या पुणे विमानतळाचा रनवे मोठा करून तातडीने यूएस, यूकेच्या फ्लाईटची सुविधा करावी. याबाबत राजकारणी लोक, स्थानिक लोकप्रतिनिधी थोडेही लक्ष घालत नाहीत.

– सी. एस. बोगल (निवृत्त कर्नल) हिंजवडी, आयटी पार्क असोसिएशन

हेही वाचा

Back to top button