शहरातील 95 टक्के शाळांची आरटीईसाठी नोंदणी.. | पुढारी

शहरातील 95 टक्के शाळांची आरटीईसाठी नोंदणी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेशासाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील 95 टक्के शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 562 पैकी 539 शाळांची नोंदणी प्रक्रिया झाली असून, आज बुधवारी (दि. 3) शाळा नोंदणीचा अखेरचा दिवस आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या (प्रा.) प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिली.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांना 6 ते 18 मार्च या कालावधीत नोंदणीच्या सूचना दिल्या होत्या. यंदा शासकीय तसेच अनुदानित शाळांनाही प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण देण्यास काही काळ गेला. त्यामुळे शाळा नोंदणीसाठीची मुदत 3 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. दरम्यान, मंगळवार सायंकाळपर्यंत प्रशासनाकडे औंध विभागातून 127, बिबवेवाडी 139, हडपसर 117, पुणे शहर 61 व येरवडा विभागातील 95 शाळांनी नोंदणी केली आहे. याप्रकारे 539 शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आरटीई समन्वयक वैशाली पांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button