Loksabha election : वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यातून वसंत मोरे रिंगणात | पुढारी

Loksabha election : वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यातून वसंत मोरे रिंगणात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून माजी नगरसेवक वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची विनंती केली होती. दरम्यान, वंचितने शिरूरमधून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांच्यासह अविनाश भोसीकर (नांदेड), बाबासाहेब उगले (परभणी), अफसर खान (औरंगाबाद) यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 25 उमेदवार घोषित केले आहेत.

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत असलेले वसंत मोरे पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. नुकताच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून 2019 मध्ये निवडणूक लढविली होती.

त्या वेळी त्यांचे उमेदवार अनिल जाधव यांना 64,793 मते म्हणजे 6.26 टक्के मते मिळाली होती. आघाडीने या वेळी मोरे यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. वसंत मोरे म्हणाले, पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला. विकासाचा कात्रज पॅटर्न पुण्यात राबविण्यात येईल. वाहतुकीची समस्या पुण्यात मोठी आहे. ती सोडविण्याबरोबरच आरोग्य, पाणीपुरवठा या क्षेत्रांत पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही काम करू.

बारामतीत सुप्रिया सुळेंना ‘वंचित’चा पाठिंबा

बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज, नागपूर येथून विकास ठाकरे या काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी बारामती येथून सुप्रिया सुळे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button