पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता… दररोज रात्री मी दचकून उठायचो. मागील दहा वर्षात मला एकदाही नीट झोप लागली नाही. दहा वर्षांपूर्वी प्रेयसीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांजवळ ही कबुली दिली.
किशोर लक्ष्मण घारे (रा. डोणे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चांदणी सत्यवान लांडगे (२२, रा. बलदेवनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर आणि मयत चांदणी यांचे प्रेमसंबंध होते. चांदणीची गर्भधारणा झाल्याने तिने किशोरकडे लग्नासाठी तगादा लावला. त्यामुळे चिडलेल्या किशोर याने लग्नाच्या बहाण्याने नेऊन चांदणीचा खून केला व मृतदेह जंगलात फेकून दिला.
त्यानंतर दहा वर्षांनी वाकड पोलिसांना चांदणीचा खून झाल्याची कुणकुण लागली. त्यानुसार, त्यांनी किशोरला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांने चांदणीला लग्नाच्या बहाण्याने नेऊन खून केल्याची कबुली दिली.
चांदणीचा खून केल्यानंतर आरोपी किशोरला झोप येत नव्हती सतत चांदणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. तो दररोज झोपेतून दचकून उठत होता. अलीकडेच त्याने मारुंजी येथे भाजी विक्रीचा व्यावसाय सुरू केला होता.
पिंपरी येथील बलदेवनगरमधील चांदणी लांडगे ही तरुणी २०११ला घरातून निघून गेली होती. प्रियकर किशोर घारे याच्यासोबत ती बेपत्ता झाली होती. दोघेही लग्न करून पळून गेले असतील असा अंदाज घरच्यांना होता.
चांदणीच्या आईने चांदणीच्या मोबाईलवर सतत संपर्क साधला होता, पण प्रत्येक वेळा किशोरच फोन घेत असे. चांदणीच्या आईने पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ही दिली होती.
किशोरही त्याच्या गावातून बेपत्ता असल्याने पोलिसांनी दोघे लग्न करून दुसरीकडे कुठे तरी राहात असतील असा अंदाज बांधला. त्यानंतर हा तपास रखडला.
पोलिस अधिकारी संतोषराव पाटील यांची नियुक्ती वाकडला पोलिस स्टेशनला निरीक्षक म्हणून झाली. काही मिसिंग केसचा आढावा घेत असताना त्यांना चांदणी लांडगे मिसिंग केस शंकास्पद वाटली. त्यांनी काही खबऱ्यांना माहिती काढण्याचे काम सोपवले.
२ दिवसांतच खबऱ्यांनी चोख काम बजावले आणि किशोर सध्या कोठे भाजी विकतो याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी किशोरला उचलून आणले. पोलिसांच्या एकदोन प्रश्नातच किशोर पोपटासारखा बोलू लागला.
चांदणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून ती गरोदर राहिली. ती लग्नासाठी तगादा लावत होती, त्यातून तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह मावळ भागातील जंगलात फेकून दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सुनील टोणपे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, अनिल लोहार, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दीपक भोसले, वंदू गिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, सागर कोतवाल.