बिबट्याची दहशत कायम ! बिबट्याच्या हल्ल्यात 2 जनावरे ठार, वासरू जखमी | पुढारी

बिबट्याची दहशत कायम ! बिबट्याच्या हल्ल्यात 2 जनावरे ठार, वासरू जखमी

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत धरणखोर्‍यातील खाणू (ता. वेल्हे) येथे 3 बिबट्यांनी एकाच वेळी जनावरांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात एक गाय, एक वासरू जागीच ठार झाले, तर दुसरे वासरू गंभीर जखमी झाले. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रानात घडला. सखाराम जिजाबा भोड हे रानातून जनावरे घेऊन घरी चालले होते. त्या वेळी पाऊलवाटेवरील झुडपात धबा धरून बसलेल्या 3 बिबट्यांनी एकाच वेळी जनावरांच्या कळपावर हल्ला केला. बिबट्यांना पाहून सखाराम जनावरांना सोडून धावत घरी आले. खाणू गावात दोन-तीन कुटुंबेच राहत आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे सखाराम भोड हे रात्री रानात गेले नाही. काही जनावरे रात्री घरी आली; मात्र एक गाय व दोन वासरे आली नाहीत. शुक्रवारी (दि. 22) सकाळी सखाराम रानात गेले असता बिबट्याच्या हल्ल्यात गाय व वासरू जागीच ठार झाल्याचे दिसले, तर एक वासरू गंभीर जखमी अवस्थेत झुडपात पडलेले दिसले.

आतापर्यंत 15 हून अधिक जनावरांचा फडशा

पानशेत खोर्‍यातील जंगलात वणव्यांमुळे तसेच अन्न-पाण्याच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी नागरी वस्त्यांत धाव घेत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यापासून गेल्या दीड महिन्यात या भागात बिबट्यांनी 15 हून अधिक जनावरांचा फडशा पाडला आहे.

मादीसह चार बिबट्यांचा वावर

गंभीर जखमी वासरूही दगावण्याची शक्यता आहे. या भागात एका मादीसह 4 बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रानावनात जाणे धोक्याचे झाल्याचे टेकपोळेचे माजी सरपंच दिनकर बामगुडे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील जंगलात बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांच्या हल्लात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा पंचनामा करण्यात येणार आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन पशुसंवर्धन विभागामार्फत केले जाणार आहे. त्यानंतर नुकसानभरपाई शासन निर्णयानुसार संबंधित शेतकर्‍यांना दिली जाणार आहे.

– स्वप्निल उंबरकर, वनरक्षक, पानशेत विभाग

हेही वाचा

Back to top button