Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट जागीच ठार..! | पुढारी

Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट जागीच ठार..!

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपास जवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने सहा वर्षाची बिबट्याची मादी जागीच ठार झाली. या घटनेची माहिती मिळताच ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांची टीम घटनास्थळी पोचली व या बिबट्याचा मृतदेह माणिकडोह या ठिकाणी हलवण्यात आला आहे. दरम्यान अशाप्रकारे अपघातामध्ये बिबट्यांचा मृत्यू होण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून वाढल्याआहेत.

नगर-कल्याण महामार्ग व पुणे-नाशिक महामार्ग या ठिकाणी वाहनांच्या धडकेने बिबटे ठार होण्याचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाने वाहने सावकाश चालवा, या ठिकाणी बिबट्या रस्ता ओलांडत आहे अशा प्रकारचे फलक देखील लावलेले आहेत. परंतु रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो आणि बिबट्याला वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे धडकेमुळे बिबट्यांचे मृत्यू होत आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढली असून वारंवार पाळीव प्राणी व मानवावर होत असलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र संतापाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. बिबट्याचा उपद्रव आणि बिबट्यांपासून होणारे हल्ले यामुळे वनविभागाचे कर्मचारी देखील मेटाकुटीला आले आहेत. शासन बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना करणार तरी कधी?असा सवाल व्यक्त केला जात आहे.

दरम्यान साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे उसाचे प्लॉट रिकामे झाले आहेत. नवीन लागवड केलेल्या उसाची उंची कमी असल्यामुळे हे बिबटे बाहेर इतरत्र फिरताना दिसतात. बेल्हे परिसरामध्ये आणे खिंडीत दोन बिबटे दिवसाढवळ्या डोंगराच्या कडेला फिरताना लोकांनी पाहिले आहेत. सध्या सैरभैर होणारे हे बिबटे रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडत असताना वाहनाचा अंदाज येत नसल्याने व समोरचं वाहन न दिसल्यामुळे असे अपघात होत असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. आजवर पुणे-नाशिक महामार्ग आणि नगर-कल्याण महामार्गावर तरस, कोल्हे यांच्या देखील वाहनांच्या धडकेने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

Back to top button