Spinal Tumor : स्पायनल ट्युमरपासून बचाव कसा कराल? | पुढारी

Spinal Tumor : स्पायनल ट्युमरपासून बचाव कसा कराल?

डॉ. संतोष काळे

पाठीच्या मणक्यात काही विशिष्ट पेशींची वाढ होते. त्यांचा ढीग साचतो आणि तिथे गाठ तयार होते. दोन मणक्यातील जागेत किंवा त्याला सांधणार्‍या स्तरावर ही गाठ विकसित होते. अर्थात, मणक्याच्या हाडात तुलनेने अशा प्रकारची गाठ बर्‍याच कमी प्रमाणात आढळून येते.

पूर्वीच्या तुलनेत अलीकडचे जीवनमान खूपच बदलले आहे. शहरांमध्ये घड्याळाच्या काट्याप्रमाणे माणसे धावत असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिनीत एवढी व्यस्त झालेली दिसते की स्वतःच्या लहानमोठ्या दुखण्यांकडे ती नेहमीच दुर्लक्ष करत असते. छोटासा घरगुती उपचार करून होत असलेल्या दुखण्यांचे स्वतःच निदान करून दिवस ढकलणारेही बरेच जण असतात. यामुळे या वेदना हळूहळू गंभीर रूप धारण करू लागतात. हाडे हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हाडांशिवाय शरीर अशी आपण कल्पनाही करू शकत नाही. हाडांमुळेच आपल्या शरीराला आकार आणि आधार प्राप्त होतो. शरीरातील सर्वात महत्त्वाचे हाड म्हणजे पाठीचा मणका असतो. अलीकडच्या काळात बर्‍याच लोकांना कंबरदुखीचा त्रास होताना दिसतो. हा त्रास पाठीच्या कण्यामध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे होत असतो. पाठीच्या मणक्यात काही विशिष्ट पेशींची वाढ होते. त्यांचा ढीग साचतो आणि तिथे गाठ तयार होते. दोन मणक्यातील जागेत किंवा त्याला सांधणार्‍या स्तरावर ही गाठ विकसित होते. अर्थात, मणक्याच्या हाडात तुलनेने अशा प्रकारची गाठ बर्‍याच कमी प्रमाणात आढळून येते.

याला शास्त्रीय भाषेत नियोप्लाझ्म असे म्हणतात. सामान्यपणे नियोप्लाझ्म दोन प्रकारचे असतात. बिनाईन म्हणजेच जे कॅन्सरग्रस्त नसतात आणि मॅलींगनॅट जे कॅन्सरग्रस्त असतात. बिनाईन ट्युमर हाडांच्या सामान्य ऊतींना नष्ट करणारे असले तरी ते दुसर्‍या ऊतींना प्रभावित करत नाहीत. मात्र मॅलींगनॅट ट्युमर मणक्याच्या पेशींवर हल्ला करतातच. इतकेच नाही तर त्यांच्यात इतर भागांपर्यंत पोहोचण्याचीही क्षमता असते. बहुतेक नॉन कॅन्सर ट्युमर शरीराच्या अन्य भागात पसरण्याऐवजी मणक्याच्या हाडातच विकसित होतात. यांना प्रायमरी ट्युमर असेही म्हणतात आणि ते नॉन कॅन्सरस असतात.

मणक्याच्या हाडांमधील ट्युमर प्रत्येक वयातील लोकांना प्रभावित करत असतो. परंतु, जास्त करून हा त्रास तरुण मध्यम वयाच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. स्पायनल ट्युमरची लक्षणे अनेक तत्त्वांवर अवलंबून असतात. हा ट्युमर मणक्याच्या हाडांमध्ये कुठल्या ठिकाणी आहे, तो किती वेगाने वाढत आहे, मणक्याच्या इतर भागांपर्यंत पसरला आहे की नाही, मणक्याचे हाड आणि मज्जातंतूंवर त्याचा परिणाम झालेला आहे की नाही, मणक्याच्या स्थैर्यावर त्याचा किती प्रभाव पडला आहे, इत्यादी गोष्टींवर लक्षणे अवलंबून असतात. पाठीचे दुखणे हे सामान्यपणे सर्वात प्रबळ लक्षण असते. परंतु, यामुळे मणक्यावर दाब निर्माण होऊ शकतो.

शरीराच्या निरनिराळ्या भागातून वेदना येत आहेत, अशी जाणीव होते. या वेदना गंभीर आणि बहुतेक वेळा सतत होत असतात. तसेच यासोबत जळजळण्याची जाणीवही होते. याचा परिणाम मेंदूवरही होतो. चेतनाशून्यता येणे, टोचणे आणि तापमान किंवा थंडपणा याची जाणीव कमी होऊ लागते. स्नायूंशी संपर्कात येऊन त्यांना बाधित करणारा ट्युमर स्नायूंशी संबंधित लक्षणे निर्माण करू शकतो. स्नायूंचा कमकुवतपणा किंवा आतडे, मूत्राशय यावरील नियंत्रण हरवणे यांसारखी लक्षणेही दिसतात. ट्युमर जसजसा पसरतो तसतशी शरीराची शक्तीदेखील क्षीण होत जाते आणि माणूस कमकुवत होत जातो. अनेकदा हाताने वस्तू उचलणेदेखील अडचणीचे ठरू लागते.

स्पायनल ट्युमरवरील उपचार : शस्त्रक्रियेशिवाय होणारा उपचार हा नॉनसर्जिकल ट्रीटमेंट ट्युमर यानुसार होत असतो. यामध्ये झालेला ट्युमर बिनाईन आहे की मॅलींगनॅट आहे हे आधी बघितले जाते.

ब्रेसिंग : यामध्ये कॉन्सेटद्वारे पाठीच्या मणक्याला आधार मिळतो आणि वेदना कमी होतात. यालाच ब्रेस असेही म्हणतात. रुग्णाच्या विशिष्ट गरजेनुसार अनुरूप असे खास ब्रेस तयार करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेतली जाते.

किमोथेरपी : या उपचारामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ किमोथेरपीद्वारे रोखली जाते. या पेशी नष्ट करणारे औषध वापरून कर्करोगाचा उपचार करून त्यावर नियंत्रण आणले जाते. किमोथेरपीची अशी अनेक प्रकारची औषधे आहेत, जी अन्य उपचारांसोबतसुद्धा वापरली जाऊ शकतात.

रेडिएशन थेरपी : या थेरपीद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. गाठ छोटी करून तिची वाढ रोखून आजार नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे सहाय्य मिळते. रेडिएशन मॅलिंग्टन पेशींच्या डीएनएला आपला निशाणा बनवतात.

शस्त्रक्रियेचा उपचार : वेदना कमी करून मज्जातंतूंचे काम सुरळीत करणे आणि त्यांची क्रियाशीलता कायम ठेवून मणक्याला स्थिरता प्रदान करणे हाच शस्त्रक्रियेचा प्रमुख उद्देश असतो. शस्त्रक्रियेद्वारे अल्प प्रमाणात किंवा पूर्णपणे काढल्यानंतरही काही ट्युमर्ससाठी रेडिएशन किंवा किमोथेरपीसारख्या शस्त्रक्रियारहित इलाजांची गरज भासते. वैद्यकीय शास्त्राने या क्षेत्रात एक अद्भुत शोध लावला आहे. खास करून पाठीच्या दुखण्यासाठी आणि त्यावरील उपचारांसाठी हा शोध बराचसा सहज आणि संतोषजनक बनला आहे. यामध्ये एण्डोस्कोपी आणि मायक्रोस्कोपी शस्त्रक्रियेचा समावेश होतो. यांच्या माध्यमातून रुग्णांना फारशा वेदना जाणवणार नाहीत इतकेच नाही तर रुग्ण काही दिवसांतच घरी जाऊ शकतात. या उपचारपद्धतीद्वारे मोठमोठ्या त्रासांवरील उपचारदेखील आता सोपे झाले आहेत. पूर्वीच्या शस्त्रक्रियेमुळे होणारा रक्तस्राव, संसर्ग आणि हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ राहावे लागणे आता कमी झाले आहे.

स्पायनल ट्युमरपासून बचाव कसा कराल?

धावपळीच्या जीवनात शरीराची देखभाल करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. खाण्या-पिण्यामध्ये अनियमितता, पौष्टिक आहाराची कमतरता, फास्ट फूडचा अतिरिक्त वापर यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. परिणामी, अनेक आजार होतात. यामध्ये कर्करोगाचाही समावेश आहे. त्यामुळे स्पायनल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करावा. सिगरेट प्यायल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयाचा झटका आणि अन्य दुसर्‍या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्याचसोबत कर्करोगाच्या पेशी रोखण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या, हरभरे आणि फळे खावीत.

Back to top button