वयोवृद्ध खेळाडूंना मासिक मानधन योजनेचा लाभ; ’महाराष्ट्र केसरी’तील 24 मल्लांचा समावेश | पुढारी

वयोवृद्ध खेळाडूंना मासिक मानधन योजनेचा लाभ; ’महाराष्ट्र केसरी’तील 24 मल्लांचा समावेश

पुणे : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडूंना मानधन योजना क्रीडा संचालनालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत वयोवृद्ध खेळाडू आणि किताबप्राप्त कुस्तीगिरांना देण्यात येणार्‍या मानधन रकमेत वाढ केली. या वर्षी तब्बल 112 वयोवृद्ध मल्लांना याचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये 24 महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी असलेल्या मल्लांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत वयोवृद्ध खेळाडूंना मानधनासाठी उत्पन्नाची मर्यादा दोन लाख रुपये तसेच वयोवृद्ध खेळाडूंनी त्यांचे हयातीचे आणि उत्पन्नाचे दाखले सादर करणे आवश्यक आहे. याबरोबरच अर्जदार पुरुष किंवा महिला खेळाडूचे वय अर्ज करण्याच्या तारखेस 50 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानधनासाठी खेळाडू हा ऑलिम्पिक, आशियाई किंवा कॉमनवेल्थ यापैकी किमान एका स्पर्धेत सहभागी झालेला असावा.

राज्यातील 112 वयोवृद्ध खेळाडूंना मानधन योजनेंतर्गत 2023-24 मध्ये 11 लाख 55 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत राष्ट्रीय स्तरावर 56 वयोवृद्ध मल्ल, ऑलिम्पिक-जागतिक स्पर्धेतील 3 मल्ल, आशियाई-एशियन स्पर्धेतील 21 मल्ल, हिंदकेसरी 6 मल्ल, रुस्तुम-ए-हिंद 1, महान भारत केसरी 1, तर महाराष्ट्र केसरीच्या तब्बल 24 मल्लांचा समावेश आहे.

असे आहे मानधन

  • राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी : 7,500 रुपये
  • आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्य कुस्ती,
  • अर्जुन पुरस्कार : 15 हजार रुपये
  • आशियाई, एशियन गेम्स, राष्ट्रकुल, इतर आंतरराष्ट्रीय
  • स्पर्धा : 10 हजार रुपये

हिंद केसरी, रुस्तुम-ए-हिंद, भारत केसरी, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी ः 15 हजार रुपये वयोवृद्ध मल्लांच्या मानधनात यापूर्वी डिसेंबर 2012 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने मल्लांच्या मानधनात वाढ करण्याबाबतची मागणी होत होती. शासनाकडे त्याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून प्रत्येक प्रकाराप्रमाणे मानधनामध्ये दुपटीने वाढ केली असून, सद्य:स्थितीत राज्यात 112 वयोवृद्ध मल्ल असून, त्यांना हे मानधन मिळणार आहे.

– सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

हेही वाचा

Back to top button