कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणार्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. अशाप्रकारे मतदान करण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांमार्फत नमुना -12 ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणार्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
नमुना-12 ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरून ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत दि. 12 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोहोचणे आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत असे नमुना-12 ड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देणार आहेत.
टपाली मतपत्रिकेची मागणी करणार्या अशा मतदाराला त्याचे मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल. अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही. घरोघरी मतदान करण्यासाठीचे पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली
मतपत्रिकेची सुविधा मागणी करणार्या मतदाराच्या घरी भेट देईल. असा मतदार या भेटीच्या वेळी अनुपस्थित असल्यास हे पथक एका अंतिम संधीसाठी मतदाराच्या घरी भेट देईल.
दुसर्या भेटीच्या वेळीसुद्धा मतदार उपस्थित नसल्यास अशा मतदाराला टपाली अथवा मतदान केंद्रावर मतदानाची संधी मिळणार नाही. या सुविधेच्या अनुषंगाने मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणार्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांकडे विचारणा करावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी कळविले
आहे.