मनसे महायुतीत आल्यास पुण्यात भाजपच ‘किंग’ : जाणकारांचा अंदाज | पुढारी

मनसे महायुतीत आल्यास पुण्यात भाजपच 'किंग' : जाणकारांचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सहभागी झाली, तर पुण्यात सुमारे लाखभर मते भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. भाजपसोबतची शिवसेनेची युती तुटल्यानंतर कमी होणारी मते या पद्धतीने भरून येतील, असा राजकीय क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची मंगळवारी (दि.19) दिल्लीत बैठक झाली. भाजपची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती आहे. त्यांच्यात जागा वाटपावरून सध्या वाटाघाटी सुरू आहेत.

त्यातच मनसेही सहभागी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसेने लोकसभेच्या एक ते तीन जागा मागितल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या तिन्ही जागांवर गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ते तिन्ही खासदार सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपसोबत महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्यास जागा वाटपाची चर्चा आणखी रेंगाळण्याची शक्यता आहे. तसेच, शिंदे यांच्या शिवसेनेला मनसेसाठी काही जागा द्याव्या लागण्याची शक्यता आहे. मनसे युतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असे मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुण्यात मनसेने 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी मनसेच्या उमेदवारांना अनुक्रमे 76 हजार आणि 93 हजार मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपला जोरदार टक्कर दिली होती.

कोथरूड, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंटसह सहाही विधानसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते सक्रीय आहेत. कोथरूडमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आता भाजपच्या विरोधात उभा राहणार असला, तरी मनसेची मदत भाजपला मोलाची ठरणार आहे. कोथरूडमधील प्रत्येक प्रभागात मनसेला मानणारे कार्यकर्ते आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ मतदारसंघातून मनसेचे नगरसेवक 2014 मध्ये निवडून आले होते. कोथरूडमध्ये किशोर शिंदे, हेमंत संभूस, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मनसेचे बाबू वागसकर, बाळा शेडगे, कसबा पेठेत गणेश सातपुते, अजय शिंदे असे स्थानिक नेते आहेत. मनसेनेही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणात त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघात किमान सव्वा लाख मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता, असे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. मनसे महायुतीत आल्यास त्यांचा मताचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणार आहे.

वसंत मोरेंच्या जाण्याने फारसा फरक नाही

मनसेतून माजी नगरसेवक वसंत मोरे हे बाहेर पडल्यानंतर, त्यांच्यासोबत पक्षाचे मोठे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले नाहीत. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात मोरे यांचा प्रभाग समाविष्ट होत नाही. त्यामुळे मोरे यांनी पक्ष सोडल्याचा फारसा फरक पडला नसल्याचा दावा मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केला.

हेही वाचा

Back to top button