भीमा नदीपात्राला जलपर्णीच्या बेड्या; नदीकाठचे ग्रामस्थ दुर्गंधीमुळे त्रस्त | पुढारी

भीमा नदीपात्राला जलपर्णीच्या बेड्या; नदीकाठचे ग्रामस्थ दुर्गंधीमुळे त्रस्त

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमा नदी पुन्हा एकदा जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. जलपर्णी उन्हामुळे सुकून गेल्याने नदीतील पाणी दूषित झाले आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा त्रास नदीकाठच्या नागरिकांना होत आहे. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांनी केली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, सादलगाव, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, वडगाव रासाई, रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, राक्षेवाडी, तसेच दौड तालुक्यातील हातवळण, नानगाव, वाळकी, कानगाव, पारगाव, देलवडी, पिंपळगाव, राहू भागातून भीमा नदी वाहते.

नदीपात्राला सध्या जलपर्णीने विळखा घातला आहे. जलपर्णीमुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्याला नदीकाठचे ग्रामस्थ वैतागले आहेत. पाण्याला दुर्गंधी सुटल्याने जनावरेदेखील हे पाणी पित नाहीत. जलपर्णीमुळे मासेमारी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे मासेदेखील मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. जलपर्णीमुळे पाण्याचा अंदाज येत नाही. त्याचा अंदाज न आल्याने भीमा नदीकाठी यापूर्वी दुर्घटना घडली आहे. जलपर्णीमुळे पंप बंद पडतात, त्यामुळे शेतक-यांना पाण्यात उतरावे लागते. शेतकरी वर्ग रात्री-अपरात्री विद्युत पंप सुरू करण्यासाठी जातात.

जलपर्णीमुळे पाण्याचा अंदाज येत नाही. नदीपात्रात नेहमीच जलपर्णी साठते. त्यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांनी केली आहे. सरपंच सचिन शेलार म्हणाले, वडगाव रासाई येथील ग्रामदैवत रासाई देवीचे मंदिर पाण्यात आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना जलपर्णीमुळे अडचण होत आहे. नदीपात्रात जाताना होडीतून जावे लागते. जलपर्णीमुळे होडी चालविताना कसरत करावी लागते. जलपर्णीवर ठोस उपाययोजना करावी. सादलगावचे सरपंच अविनाश पवार म्हणाले, सादलगाव भीमा नदीकिनारी आहे. सध्या भीमा नदीच्या पात्रातील जलपर्णी सुकली आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा

Back to top button