‘लालपरी’ बंदचा प्रवाशांना फटका; कल्याण, पुणे मार्गावर बस सुरू करण्याची मागणी | पुढारी

'लालपरी' बंदचा प्रवाशांना फटका; कल्याण, पुणे मार्गावर बस सुरू करण्याची मागणी

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या अकोले आगाराच्या कोतुळ, ब्राह्मणवाडा, बेलापूर, बोटा, आळेफाटा मार्गे धावणार्‍या कल्याण व पुणे या एसटी बस बंद असल्याने या महामार्गावरून जुन्नर तालुक्यात उच्च शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या परिवहन महामंडळाच्या अकोले आगारातून सकाळी सात वाजता अकोले येथून सुटणार्‍या व कोतुळ, ब्राह्मणवाडा, बेलापूर, बोटा, आळेफाटा व पुढे जाणार्‍या पुणे व कल्याण एसटी बस सायंकाळी पुन्हा याच महामार्गावरून अनेक वर्षांपासून धावत होत्या. यामुळे या भागातून जुन्नर तालुक्यात आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात व इतर महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांची मोठी सोय होत होती. कोरोना काळात या एसटी बस बंद झाल्या. त्यानंतर पुन्हा सुरू झाल्या व पुन्हा बंद झाल्या आहेत.

ग्रामपंचायतींच्या पत्रव्यवहाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

या बसला विद्यार्थ्यांसह प्रवाशांची संख्या चांगली होती. दरम्यान कोणतेही कारण न देता या एसटी बस बंद झाल्या आहेत. या मार्गावरील ग्रामपंचायतींनी अकोले आगाराकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला. प्रवासी व विद्यार्थीही या बसेस पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करत आहेत. मात्र, या मागणीकडे अकोले आगार दुर्लक्ष करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नियमित प्रवासीही चांगलेच त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही बस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

Back to top button