पुणे : एसटीच्या हुबेहूब मिनिएचर (लहान प्रतिकृती) साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोल्याच्या पीयूष राऊतने पहिल्यांदाच पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बसचे हुबेहूब मिनिएचर (लहान प्रतिकृती) साकारले आहे. पीएमपीच्या बसची पहिल्यांदाच अशी लहान प्रतिकृती साकारण्यात आली असून, पीयूष ती प्रतिकृती पीएमपीच्या वाहकाला (कंडक्टर) भेट देणार आहे.
राज्यातील विविध शहरांत चालवण्यात येणार्या सार्वजनिक वाहतुकीच्या बस बनवण्याचा त्याचा छंद आहे. त्याने एसटीसह अन्य सार्वजनिक वाहतुकीच्या बसदेखील साकारल्या आहेत. तसेच, त्याने आंतरराज्य वाहतूक असलेली गोवा परिवहनची कदंब बसदेखील साकारली आहे. आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यातील सर्व बस मॉडेलच्या लहान प्रतिकृती साकारणार आहे आणि त्या पीएमपी प्रशासनाला देणार आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाने पाठिंबा द्यावा, असे पीयूष राऊत याने दै.'पुढारी'च्या प्रतिनिधीला सांगितले.
चिखली आगारात असलेल्या शिंदे यांच्या मदतीने पीयूषने ही प्रतिकृती बनवली आहे. शिंदे ज्या मार्गावरील गाडीत वाहकाचे काम करतात. त्याच मार्गाची पाटी पीयूषने या बसला लावली आहे. 'चिखली-मनपा' अशा नावाची ही पाटी लहान प्रतिकृतीवर झळकत असल्यामुळे, ही बस प्रवासी वाहतुकीसाठी जणू सज्जच असल्याचा भास होत आहे. यावरून बस वाहकाचेदेखील आपल्या
नेहमीच्या बसवरीलप्रेम दिसून येत असून, तिच्याबद्दल असलेली
आत्मियता पाहायला मिळत आहे.
पीएमपीतून दररोज 12 ते 13 लाख पुणेकर प्रवासी प्रवास करत आहेत. त्यांच्यासाठी त्याने 'फोम' शीटच्या माध्यमातून ही बस बनवली आहे. त्यासाठी त्याला सुमारे 4 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पीएमपीच्या बसची लहान प्रतिकृती बनवण्याचा त्याचा पहिलाच प्रयत्न होता. त्यात तो यशस्वी झाला.
हेही वाचा