जागतिक मातृभाषा दिन : तंत्रज्ञानाने विदेशी भाषा शिक्षण मातृभाषेत उपलब्ध | पुढारी

जागतिक मातृभाषा दिन : तंत्रज्ञानाने विदेशी भाषा शिक्षण मातृभाषेत उपलब्ध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : परदेशी भाषांसह भारतीय प्रादेशिक भाषांमधील ज्ञान मातृभाषेतून शिकण्याची संधी आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाले आहे. लहान मुलांसह सर्व जण मातृभाषेतून संवाद साधण्यास, शिक्षण घेण्यास प्राधान्य देत असून, परदेशी भाषा तसेच देशांतर्गत प्रादेशिक भाषांमधील माहिती तुमच्या मातृभाषेत भाषांतरित करून देण्यासाठीचे विविध अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अन्य भाषेतील ज्ञान आणि माहिती मातृभाषेत उपलब्ध होत असून, ज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावली आहे.

मातृभाषा ही लहान मुलांसह सगळ्यांनाच येते आणि कित्येक जण आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेणे पसंत करतात, अशावेळी परदेशी भाषांसह भारतीय प्रादेशिक भाषांमधील ज्ञान, माहिती मातृभाषेतून उपलब्ध होण्यास विविध संकेतस्थळे, ऑनलाइन टुल्स, वेगवेगळ्या अ‍ॅप्सद्वारे मदत होत आहे. अ‍ॅपद्वारे इतर भाषांमधील शब्द, वाक्य मातृभाषेतून भाषांतरित करणे सुलभ झाले असून, त्यामुळे इतर भाषांचे ज्ञान मातृभाषेतून प्रभावीपणे शालेय विद्यार्थी असो वा आयटी कंपनीत काम करणारी तरुणाई… अशा विविध क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहोचत असून, अनेकांना इतर भाषा शिकणेही सोयीचे झाले आहे. प्रत्येक जण अशा अ‍ॅपचा प्रभावी वापर करत असून, तंत्रज्ञानाने जगभरातील भाषांना एकमेकांशी जोडले आहे.

आधी मातृभाषेत शिक्षण घेतलेल्यांना इतर भाषांमध्ये संवाद साधणे, त्यातील माहिती प्राप्त करण्यासाठी अडचणी येत होत्या. पण, आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या अडचणीही दूर झाल्या असून, गुगल ट्रान्सलेशन असो वा इतर अ‍ॅपद्वारे अन्य भाषांमधील शब्द, वाक्य, उतारे आपल्या मातृभाषेत भाषांतरित करता येत असून, त्यामुळे जगभरात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधणे, माहिती मिळविणे सोपे बनले आहे. बुधवारी (दि.21) साजरा होणार्‍या जागतिक मातृभाषा दिनानिमित्त दै. पुढारीने याबद्दल जाणून घेतले.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. त्यामुळे मातृभाषेतून अन्य भाषांचे ज्ञान मिळविणे सोपे झाले आहे. विशेष म्हणजे आपल्याला ऑनलाइन ट्रान्सलेशन टुल्सच्या आणि विविध अ‍ॅपच्या माध्यमातून इतर भाषांमधील शब्द, वाक्य हे आपल्या मातृभाषेतून भाषांतरित करणेही सुलभ झाले आहे.

इतर भाषांची माहिती मिळवण्यासाठी टुल्स

गुगल प्ले स्टोअरवर गेल्यावर आपल्याला इतर भाषेतील शब्द, वाक्य मातृभाषेत भाषांतरित करण्यासाठीचे अनेक अ‍ॅप दिसून येतील. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर भाषांतर करणे सोयीचे होते. या अ‍ॅपमध्ये आपण मातृभाषेतून शब्द टाईप करून भाषांतराच्या माध्यमातून इतर भाषांची माहिती मिळवू शकतो. अनेक ऑनलाइन टुल्सही उपलब्ध असून, त्याद्वारे अन्य भाषांमधील माहितीही आपल्याला जाणून घेता येईल.

हेही वाचा

Back to top button