वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन फोडली | पुढारी

वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन फोडली

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी, नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील 45 गावांमधील 102 पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथे अज्ञात व्यक्तीने फोडल्याने वांबोरी चारीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन फोडणार्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात मुळा पाटबंधारे विभागाने पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेली माहिती अशी की, दहा दिवसांपूर्वी देखील गितेवाडी गावाजवळ मुख्य पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने फोडली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्ती विरोधात पाथर्डी पोलिसात शाखा अभियंता विजय मोगल यांनी गुन्हा दाखल केला होता. पाईपलाईन फोडणार्‍याचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर चार दिवसांनी त्याच जागेवर अज्ञात व्यक्तीने मुख्य पाईपलाईन फोडल्याचा प्रकार उघडकीस आल्याने वांबोरी चारीचा पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ मुळा पाटबंधारे विभागावर आली. त्यामुळे लाभधारक गावांसाठी दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे. गितेवाडीजवळ मुख्य पाईपलाईन फोडल्याची माहिती समजतात भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, युवानेते अशोक टेमकर, प्रगतशील शेतकरी विजय शिंदे, विष्णूपंत टेमकर, बाळू गायकवाड, देविदास टेमकर, संजय शिरसाठ यांच्यासह शाखा अभियंता विजय मोगल, पोलिस हेडकॉन्स्टेबल पोपट आव्हाड यांनी पाईपलाईन फोडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. मुख्य पाईपलाईन फोडणार्‍या व्यक्तीचा निश्चितपणे शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल पोपट आव्हाड यांनी सांगितले. प्रत्येक लाभधारक पाझर तलावापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाचे प्रयत्न असून, कोणीही पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न करू नये. पाईपलाईन फोडणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शाखा अभियंता विजय मोगल यांनी दिला आहे.

Back to top button