खेडच्या दुर्गम भागातील शेतकर्‍यांनी फुलवली स्ट्रॉबेरी | पुढारी

खेडच्या दुर्गम भागातील शेतकर्‍यांनी फुलवली स्ट्रॉबेरी

वाडा : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असल्याचे चित्र धुवोली, भिवेगाव येथे पहायला मिळत आहे. वातावरणातील बदल लक्षात घेत येथील शेतकरी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळाला आहे. या भागातील शेतकर्यांनी स्ट्रॅाबेरीची लागवड केली आहे. आयसीआयसीआय फाउंडेशनने खेडमधील शेतकर्‍यांना स्ट्रॅाबेरीची लागवड करण्याबाबत आवाहन केले होते. त्यास धुवोली व भिवेगांव येथील शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिल्याने फाउंडेशनच्या वतीने रोपे पुरवण्यात आली. सेंद्रिय पद्धतीने करण्यात आलेल्या या लागवडीबाबत धुवोली येथील शेतकरी सुनील जठार, बाळू कोरडे, सीमा जठार यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून आम्ही स्ट्रॅाबेरी पिकाच्या लागवडीबाबत माहिती घेत होतो. चालू वर्षी आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे आम्हाला रोपे उपलब्ध झाल्याने लागवडीची तयारी केली. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला तीन हजार रोपे उपलब्ध झाली. रोपांची वाढ चांगली व्हावी या उद्देशाने प्रथम आलेली फुले तोडून टाकली आहेत. लागवडीनंतर फुलांमधून फळधारणा होऊन तेथून पुढे तीन ते चार महिने स्ट्रॅाबेरी पिकापासून उत्पन्न मिळू लागले आहे.

वातावरण चांगले असून पिकाला कोणताही औषध वा खतांचा खर्च नसल्याने अतिरिक्त खर्च येणार नाही. सरासरी दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा सुनील जठार यांनी व्यक्त केली. खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा हा खरीप हंगामात भात तर रब्बी हंगामात गहू, हरभरा, वटाणा, मसूर या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, पारंपरिक पिकांचे मिळणारे तुटपुंजे उत्पन्न पाहता आता काही शेतकर्‍यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. पुढील काही वर्षात अधिकाधिक शेतकरी याकडे वळतील व महाबळेश्वरप्रमाणेच स्ट्रॅाबेरीचे उत्पादन घेतील. त्यातून शेतकर्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, असे आयसीआयसीआय फाउंडेशनचे म्हणणे आहे.

Back to top button