किल्ले शिवनेरी जाणार ‘युनेस्को’च्या यादीत ; आ. अतुल बेनके यांची माहिती | पुढारी

किल्ले शिवनेरी जाणार ‘युनेस्को’च्या यादीत ; आ. अतुल बेनके यांची माहिती

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गडकिल्ल्यांची बांधणी करून सक्षम स्वराज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभ्या असलेल्या या गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शिवनेरी, साल्हेर लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारमार्फत जुन्नरसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरीव निधी मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचेही आमदार बेनके यांनी सांगितले. सातवाहन काळातील बुद्ध लेणी, महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळे व जुन्नरमधील पर्यटनस्थळे, याकडे जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच जुन्नरचा पर्यटनविकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आमदार बेनके यांनी मानमोडी डोंगर येथील अंबा अंबिका बुद्धलेणीत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तहसीलदार रवींद्र सबनीस, पुणे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, सह्याद्री गिरिभ—मण संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी, पुरातत्व विभागाचे गोकूळ दाभाडे, वनपाल नितीन विधाटे, वनरक्षक रमेश खरमाळे, देविदास मिसाळ, बाळासाहेब विधाटे, सिद्धार्थ कसबे आदी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यटनमंत्री श्री. रेड्डी व महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गकेलेल्या पाठपुराव्यामुळे येणार्‍या अर्थसंकल्पात पर्यटनासाठी निधी प्राप्त होणार आहे. जुन्नर तालुक्यातील विविध गावांतील सरपंचांकडून गावांतील महत्त्वाच्या स्थळांची माहिती घेतली असून, विशेष पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी तसेच बुद्धकालीन लेण्याचे संवर्धन व जतन करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सकारात्मक दृष्टीने पावले उचलत आहे. पायाभूत सुविधांबरोबरच तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली.

Back to top button