चिंताजनक ! अजूनही 40 टक्के मुले कुपोषित | पुढारी

चिंताजनक ! अजूनही 40 टक्के मुले कुपोषित

पुणे : आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचे मासिक उत्पन्न अजूनही 10 हजार रुपये इतकेसुध्दा नाही. शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात एक अब्ज टन शेती उत्पन्न घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त दूध, भात, गव्हाच्या उत्पादनावर भर दिला जातो. मात्र तरीही देशातील 40 टक्के मुले कुपोषित आहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आर्थिक विकासाची पुनर्रचना करण्याची वेळ आली असून, देशाला नवे अर्थशास्त्र तयार करावे लागेल असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले. शहरातील महावीर जैन विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.देसरडा यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशाची अर्थिक,सामाजिक परिस्थिती या विषयावर वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव युवराज शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी प्रा.देसरडा यांनी सामाजिक विषमता,गरीब-श्रीमंत यांच्या वाढणारी दरी,शेतकर्‍यांचे आर्थिक गणित,शेतमालाचा भाव आणि वाढणार्‍या आत्महत्या या परिस्थितीवर आपले विचार स्पष्टपणे मांडले.

आता नव्या अर्थशास्त्राची गरज…
प्रा. देसरडा म्हणाले, जीवनाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा या आता पूर्ण करता येत नाहीत. ते सरकार समोरच मोठे आव्हान होवून बसले आहे.नव्या पिढीला जीवनाचे ध्येयच माहिती नाही. खाओ- पिओ- जिओ अशी ही पिढी तयार होत आहे. दिवसेंदिवस देशात होत चाललेले वेगवेगळे बदल समृद्धीकडे नेत आहेत की, विध्वंसाकडे.. हेच कळत नाही. एकवीसाव्या शतकाचे अर्थशास्त्र हे 19 व 20 व्या अर्थशास्त्रापेक्षा वेगळे व्हायला हवे. आपण नवीन अर्थशास्त्राचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी आर्थिक विकासाची पुर्नरचना करणे आवश्यक आहे.

शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे..
आपल्या देशात 10 ते 15 कोटी शेतमजूर राबतात. शेतमालाला बाजारभाव नसणे, ऋतूमानाची बदलती स्थिती, वाढत्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. शेती प्रत्येकाची जीवनदायिनी असून उत्पादनाचे यांत्रिकीकरण करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

वैज्ञानिक प्रगतीने समाज बदलला पण…
वैज्ञानिक प्रगतीने समाज बदलला असला तरीही, निसर्ग मानवाच्या जीवनाचा मूलाधार असल्याचे विसरता कामा नये. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मानव, निसर्ग आणि समाजाचे नाते विस्कळित झाले आहे. ही चिंतेची बाब असून भविष्यात त्याचे धोके दिसतील. दुसरीकडे जगाची वाटचाल वेगाने होत असताना मनुष्य आणि समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे डॉ .देसरडा यांनी सांगितले. यावेळी युवराज शहा यांनी प्रा.देसरडा यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अन आठवणी सांगत त्यांचे साधेपण विषद केले.

हेही वाचा :

Back to top button