महात्मा गांधी अवमान : खासगी फौजदारी तक्रार दाखल करून घेणे योग्य ; जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश | पुढारी

महात्मा गांधी अवमान : खासगी फौजदारी तक्रार दाखल करून घेणे योग्य ; जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी फौजदारी तक्रार दाखल करून घेणे योग्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला. त्याचबरोबर या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 200 नुसार तक्रारदारांची न्यायालयात बोलावून तपासणी करण्यास न्यायालयाने मान्यता दिली असून, त्यांचा जबाब 29 जानेवारीला घेण्यात येईल, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

दरम्यान, ‘संभाजी भिडे यांचे वक्तव्य हे संपूर्ण समाजाविरोधात नसून, महात्मा गांधींबाबत केलेली व्यक्तिगत टीका आहे. त्यामुळे धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे, यासाठी भारतीय दंड संहितेत असलेले ‘कलम 153 ए’ या प्रकरणात लागू होईल का?’ अशी साशंकताही न्यायालयाने निकालात व्यक्त केली आहे.

राष्ट्रपुरुषांविरोधात बदनामीकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात पुणे न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये या प्रकरणाची चौकशी करून ‘कलम 153 ए’सह विविध कलमान्वये भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. मेधा सामंत, अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर आणि युवराज शाह यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रीया आवले आणि अ‍ॅड. बाळकृष्ण निढाळकर यांच्यामार्फत ही तक्रार दिली आहे.

156 (3) नुसार गुन्हा दाखल होण्यासाठी अपील करणार
महात्मा गांधींची बदनामी करण्याकरिता केलेली वक्तव्ये म्हणजे संपूर्ण समाजा विरोधात केलेली नाहीत, तर ती गांधींबाबत केलेली व्यक्तिगत टीका होती, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. हा गुन्हा दखलपात्र नसल्याचे सांगून कलम 156 (3) नुसार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. या निर्णयाविरोधात अपील करणार आहोत, अशी माहिती तक्रारदारांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.

Back to top button