दोन लाख 57 हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाकडून 30 लाख नोंदींची पडताळणी | पुढारी

दोन लाख 57 हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाकडून 30 लाख नोंदींची पडताळणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या दस्तांमधून सुमारे 30 लाखांहून अधिक नोंदी तपासले. या पडताळणीत सन 1967 पूर्वीच्या सुमारे दोन लाख 57 हजार नोंदी आढळल्या आहेत. त्यामध्ये शाळांचे दाखले, जन्म-मृत्यूच्या नोंदींमध्ये कुणबी नोंदींचे मोठे प्रमाण दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून आतापर्यंत सुमारे दोन लाख 57 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील खेड आणि जुन्नर तालुक्यांत सर्वाधिक नोंदी आढळल्या.

सापडलेल्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील कुणबी नोंदी अद्यापही संकेतस्थळावर टाकण्यात आलेल्या नाहीत, तर बारामतीमधील नोंदी जाहीर करण्यात आल्या आहेत. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रत्येक तालुकानिहाय संगणकीकृत करण्यात येत आहे.

मात्र, शिंदे समिती स्थापन झाल्यापासून जिल्ह्यातील बारामती आणि पिंपरी-चिंचवड या दोन ठिकाणांच्या नोंदींबाबत संकेतस्थळावर कुठलीच माहिती प्राप्त होत नसल्याचे दिसून आले होते. त्यावर प्रशासनाने दोन्ही ठिकाणच्या तहसीलदारांनी नोंदी संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बारामती तहसीलदारांना नोंदी अपलोड केल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या नोंदीही लवकरच संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button