कोल्हापूर : लाख रुपयांच्या औषधाने मुलगाच होणार सांगून फसवणूक; अवैध गर्भलिंगनिदान | पुढारी

कोल्हापूर : लाख रुपयांच्या औषधाने मुलगाच होणार सांगून फसवणूक; अवैध गर्भलिंगनिदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर म्हाडा कॉलनीतील एका घरात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या करणार्‍या टोळीचा मंगळवारी पर्दाफाश करण्यात आला. मुलगा होण्यासाठी एक लाख रुपयांचे औषध देणार्‍या एका बोगस डॉक्टरसह तिघांचा यात समावेश आहे. स्वप्नील पाटील (रा. बालिंगा) हा बोगस डॉक्टर कारवाईवेळी पसार झाला; तर अजित केरबा डोंगरे
(रा. म्हाडा कॉलनी), कृष्णात आनंदा जासूद (रा. निगवे दुमाला) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महापालिकेच्या पथकाने एका स्टींग ऑपरेशनद्वारे हे प्रकरण उघडकीस आणले. सोशल मिडियावर असलेेल्या एका जाहिरातीचा धागा पकडून चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले होते. एका डमी गरोदर पोलिस महिला कर्मचार्‍याला पाठवून हे प्रकरण उघडकीस आणण्यात आले. याप्रकरणी जबाब नोंदवून घेऊन फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. करवीर पोलिसात याबाबतचा गुन्हा नोंद होणार आहे.

स्वप्निल पाटीलसह तिघांची टोळी आहे. आमचे औषध घेतले तर शंभर टक्के मुलगाच होणार अशी जाहिरात त्यांनी सोशल मिडियावर केली होती. ही जाहिरात जिल्हाधिकारी रेखावर यांनी पाहिली. त्यांनतर आरोग्य विभाग, पोलिस आणि पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार नेमलेल्या समितीला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस मुख्यालयातील रुबीना पटेल या गर्भवती महिला कॉन्स्टेबलला डमी म्हणून तयार करण्यात आले. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर या गेल्या.

क्रांतीसिंह नाना पाटीलनगर येथील एका घरामध्ये त्यांना बोलविण्यात आले. तेथे स्वप्निल पाटील, कृष्णात जासूद, अजित डोंगरे होते. औषधासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील. सात दिवस औषध घ्यावे लागेल. औषधामुळे मुलगाच होईल. पण खात्री म्हणून औषध घेतल्यानंतर गर्भलिंंगनिदान चाचणी केली जाईल. चाचणीत मुलगी असल्याचे स्पष्ट झाल्यास गर्भपात केला जाईल. त्याचे स्वंतत्र पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आले.

या खोलीमध्ये सोनोग्राफीसह सर्व यंत्रणा सज्ज होती. येथे गर्भलिंग निदान व गर्भपातही होत असल्याची खात्री होताच रुबिना पटेल, गीता हसूरकर यांनी पोलिस व आरोग्य पथकाला बोलविले. ही पथके दाखल होताच कारवाई करण्यात आली. सोनोग्राफी मशिन, गर्भपाताचे कीट, रोख 20 हजार रुपये जप्त करण्यात आले.

सीपीआरच्या वैद्यकीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, पीसीपीएनडीटी समितीच्या अ‍ॅड. गौरी पाटील, गीता हासूरकर यांनी हे स्टींग ऑपरेशन केले. करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक युनूस इनामदार, प्रज्ञा पाटील, योगेश कांबळे, शहनाज कनवाडे, रुबीना पटेल, सचिन देसाई यांनी कारवाईत सहभाग घेतला.

रेड्याला जन्म दिलेल्या म्हशीचेच दूध प्या

मुलगाच होण्याचे औषध असल्याचा दावा करणार्‍या या टोळीने गर्भवती महिलांना तुम्ही रेड्याला जन्म दिलेल्या म्हशीचेच दूध व त्यापासून बनविलेले उपपदार्थ खा. मांसाहार करत असाल तर कोंबड्याचेच मटण खा. अंडी, मासे खाऊ नका, अशी पथ्ये पाळायला सांगीतले होते. तसेच अनेक अवैज्ञानिक दावे देखिल त्यांनी केले होते. ज्या घरात हे सर्व प्रकार सुरु होते, तेथे अंगारा, भंडारा देखील आढळून आल्याचे या आरोग्य पथकातील सदस्यांनी सांगीतले.

बांबवडेत अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. नाईक यांच्यावर गुन्हा

बांबवडे, पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील आनंद हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या भरारी पथकाने छापा टाकून येथील बेकायदेशीर गर्भपात आणि उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांचा साठा जप्त केला. या कारवाईने शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली.

मंगळवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास ही धडक कारवाई झाल्याने शाहूवाडी तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
दरम्यान, बांबवडे येथील डॉ. नाईक (मूळ गाव पोखले, ता. पन्हाळा) यांच्या मालकीच्या आनंद हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केले जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्राप्त झाल्या होत्या. महिला रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असून परिसरातील नागरिकांच्या अज्ञान आणि असहायतेचा संबंधित डॉ. नाईक गैरफायदा घेत असल्याचा अप्रत्यक्ष रागच या निनावी तक्रारदारांनी व्यक्त केल्याचे समजते. याला अनुसरून आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी गेले तीन दिवस आनंद हॉस्पिटल चालक डॉ. नाईक यांच्यावर गोपनीयरित्या पाळत ठेवली होती. यादरम्यान दोन दिवसांपूर्वी एका बनावट गरोदर स्त्री रुग्णाला डॉ. नाईक यांच्याकडे पाठवून दिले होते. डॉ. नाईक या रुग्णाला दाखल करून घेऊन रक्त, लघवी आदी चाचण्या केल्या. गर्भपात करण्यासाठी फी म्हणून 20 हजार रुपयेची डिल करण्यात आली. संबंधित महिलेला मंगळवारी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित रुग्ण महिला व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीता हासुरकर (कोल्हापूर) या दोघी आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. सुनंदा गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांच्या पथकाने आनंद हॉस्पिटल परिसरात सापळा रचून अवैधरित्या गर्भपात प्रकरणी डॉ. नाईक यांना पुराव्यानिशी रंगेहाथ पकडले. यावेळी हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यासाठी लागणार्‍या औषधाचा साठा आढळून आला आहे. भरारी पथकाने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली असून बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार हॉस्पिटलची वैद्यकीय मान्यता 2023 मध्ये समाप्त झाली आहे. शिवाय गर्भपात करण्याची परवानगी नसताना डॉ. नाईक हे आपल्या हॉस्पिटलमध्ये स्त्रियांचे गर्भपात तसेच डिलिव्हरी करीत होते. कारवाई नंतर डॉ. नाईक हे पैशाच्या हव्यासापोटी महिला रुग्णांचा जीव धोक्यात घालून उपचारांचे अतिरिक्त धाडस करीत होते, अशी परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. या गंभीर गुन्ह्याखाली संबंधित आनंद हॉस्पिटल अघोषित काळासाठी सील करण्यात येणार असल्याचे समजते. डॉ. सुनंदा गायकवाड यांनी रात्री उशिरा शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून डॉ. नाईक यांच्या विरोधात विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button