बारामतीत 18 ते 22 दरम्यान कृषिक प्रदर्शन; राजेंद्र पवार यांची माहिती | पुढारी

बारामतीत 18 ते 22 दरम्यान कृषिक प्रदर्शन; राजेंद्र पवार यांची माहिती

बारामती : पुढारी वृत्तसेवा: अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने 18 ते 22 जानेवारी या कालावधीत कृषिक या जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. ऊसक्षेत्रात होणारा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे यंदाच्या कृषिकमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीक्षेत्रात व्हावा, त्या माध्यमातून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन, मायक्रोसॉफ्ट कंपनी, अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, नाबार्ड आदी संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून आमचे संशोधन, तंत्र व संकल्पना प्रत्यक्षात कसे कार्य करतील, हे या प्रदर्शनात पाहायला मिळेल, असे पवार यांनी सांगितले.

वीसहून अधिक देशांचे तंत्रज्ञान

यंदाच्या प्रदर्शनात नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्राईल आदींसह 20 हून अधिक देशांतील एआय तंत्रज्ञान, सेन्सर, रोबोटिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलिहाऊस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टूल्स पाहता येतील. जपानमधील बायोफ्लॉक यंत्रणा, नेदरलँड, स्पेन, जर्मनी, थायलंड आदी देशांतील विषमुक्त शेती उत्पादनातील आधुनिक औषधे, नेदरलँड, अमेरिका, इंग्लंडमधील सेन्सर तंत्रज्ञानावरील आधारित प्रगत मशिनरी, इस्राईलची सूक्ष्म सिंचन प्रणाली, इटलीतील सेन्सरचलित मशिनरी तंत्रज्ञान यांचा समावेश असेल, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे व केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी दिली.

फार्म ऑफ द फ्यूचरची उभारणी

मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म वाईबद्वारे ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. देशातील पहिल्या फार्म ऑफ द फ्यूचरची उभारणी केली आहे. शेतकर्‍यांना येथे सेन्सर, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाईट मॅपिंग, रिमोट सेन्सिंग आदींची प्रत्यक्ष पाहणी करता येईल.
यांचाही असेल समावेश प्रदर्शनात क्लस्टर आधारित प्रात्यक्षिके, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, पशुपक्षी प्रदर्शन, भरडधान्य, फुलशेती, देशी बियाण्यांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश असेल.

हेही वाचा

Back to top button