मानवाकृती रोबोट 2028 पर्यंत पुण्यात तयार होणार | पुढारी

मानवाकृती रोबोट 2028 पर्यंत पुण्यात तयार होणार

आशिष देशमुख

पुणे : ह्युमनॉईड अर्थात रोबोटची मानवाकृती पुण्यातील डीआरडीओ या संस्थेतील शास्त्रज्ञ तयार करीत आहेत. मात्र, यात मानवी संवेदना व त्याची सद्सद्विवेकबुद्धी कृत्रिम पद्धतीने करायची कशी हेच त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. पुण्यातील डीआरडीओत हे संशोधन सुरू असून, 2028 पर्यंत यात यश मिळेल, असा विश्वास  तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहरात पाषाण भागात डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था)चे कार्यालय आहे. तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आगामी काळातील संरक्षणासाठी लागणार्‍या अत्याधुनिक प्रणालीवर सतत संशोधन करीत असतात.सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ह्युमनॉईड अर्थात मानवाची हुबेहुब प्रतिकृती असलेला रोबोट तयार करण्याचे आव्हान त्यांनी हाती घेतले आहे. 2028 पर्यंत तो पुणे शहरातील डीआरडीओत तयार होईल, असा विश्वास येथील शास्त्रज्ञांना आहे.

अनेक शास्त्रज्ञ आणि कंपन्यांची मदत घेणार

येथील शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे रोबोट आजवर तयार केले आहेत. पण हुबेहुब माणसासारखाच कृत्रिम माणूस (ह्युमनॉईड) तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. यात अनेक शास्त्रज्ञ आणि खासगी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. प्रामुख्याने बंगरुळू, हैदराबाद आणि पुणे येथील शास्त्रज्ञांची मदत घेतली जात आहे. तसेच 15 स्टार्टअप आणि 9 मोठ्या कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.

मेंदूतील संवेदना, विवेकबुद्धीवर  सखोल संशोधन

डीआरडीओच्या आर्ममेन्ट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टिमचे महासंचालक डॉ. शैलेंद्र गाडे व रिसर्च अ‍ॅड डेव्हलपमेन्ट विभागाचे संचालक डॉ. मकरंद जोशी यांनी सांगितले की, रोबोट तयार करणे सोपे आहे. मात्र, त्याची हुबेहुब मानवाकृती तयार करणे हे मोठे आव्हान आहे. कारण माणसाच्या मेंदूतील संदेश देणारी यंत्रणा त्यातील अत्यंत सूक्ष्म बारकावे कृत्रिम मानवात टाकणे हे कठीण काम आहे. त्याही पुढे मानवाची निर्णयक्षमता ही त्यांच्या सद्सद्विवेकबुध्दीवर अवलंबून असते. ती कृत्रिम पध्दतीने कशी तयार करायची हे फार मोठे आव्हान आमच्या समोर आहे.
माणूस रस्ता ओलांडतो तेव्हा तो त्याचा मेंदू आणि विवेकाचा वापर करतो. ही भावना ह्युमनॉडमध्ये टाकयची आहे. त्यासाठी खूप वेगळ्या प्रकारचे शेकडो सेंसर्स त्यात टाकावे लागतील. यावर आमचे संशोधन सुरू आहे. सर्वच कामे मानवरहित करावीत का हादेखील आमच्यासमोर मोठा यक्षप्रश्न आहे. मनुष्याचा सहभाग प्रत्येक ठिकाणी असायला हवा अगदी जेथे अशक्य आहे तेथेच हा ह्युमनॉईड किंवा स्वयंचलित रोबोटचा वापर करावा हा दुसरा मत प्रवाह आम्हा शास्त्रज्ञांत आहे.
– डॉ. शैलेंद्र गाडे, संचालक, आर्ममेन्ट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टिम,डीआरडीओ, पुणे
समजा, चहाचा गरम कप उचलायचा असेल, तर तो रोबोट आणि माणूस कसा उचलेल यात खूप फरक आहे. तसेच एखादी नाजूक वस्तू उचलताना माणूस तिचा विचार करून जी सावधानता सहजतेने बाळगतो. ह्याचे सेंसर्स तयार करणे खूप कठीण आहे. माणूस जिना उतरून सहजतेने खाली येतो, बसतो, गप्पा मारतो, उद्यानात सहजतेने वावरतो. या सर्व गोष्टी कृत्रिम मानवात टाकताना एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहेच. पण मानवी विवेक कृत्रिमपणे कसा करणार हेच मोठे आव्हान आमच्या समोर आहे.
-डॉ. मकरंद जोशी, संचालक, रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट विभाग, डीआरडीओ

हेही वाचा

Back to top button