Mumbai : २१ युवती करणार २७५१ किमीचा सायकल प्रवास | पुढारी

Mumbai : २१ युवती करणार २७५१ किमीचा सायकल प्रवास

घाटकोपर : पुढारी वार्ताहर, मातृभूमीचे महत्त्व आणि विविधतेत एकता हा वारसा जपणारऱ्या भारत देशात जनजागृतीचा प्रसार करण्यासाठी श्रीमती पी एन दोशी महिला महाविद्यालयाच्या २१ धाडसी युवती २१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गुवाहाटी ते गेटवे २७५१ किमीचा सायकल प्रवास करणार आहेत. (Mumbai)

२४ दिवस युवतींचा हा सायकल प्रवास सुरु राहणार आहे. एस. पी. आर. जे. कन्याशाळा ही शिक्षणसंस्था महिला शिक्षणाचे कार्य अविरत १०० वर्षे करते आहे. या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पी एन दोशी महिला महाविद्यालयाच्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी चौथे सायकलेथॉन आयोजित केले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पनेतून महाविद्यालयाच्या वतीने मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्यात जनजागृती केली जाते. महाविद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांसह सर्वच क्षेत्रातून या युवतींच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गातील या निवडक मुलींची प्रशिक्षक दानिश यांनी गेल्या दोन महिन्यापासून दर दोन तास कसून सराव करून घेतला आहे. खाण्या पिण्याचे पथ्य, रोजच डायटेनिंग सांभाळून त्यांचे फिटनेस पाहून त्यांना या प्रवाहात आणले आहे. या मोहिमेसाठी मुलींचे मानसिक व शारीरिक तपासणी करून घेऊन त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा मेनन, दिग्दर्शक डॉ. एस कुमुधावल्ली, संजय पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी जयवंत चव्हाण, विजय गुरव, गुलाब सिंह राजपूत आदींनी मेहनत घेतली. यापूर्वीही २००६ मध्ये मुंबई ते रत्नागिरी व रत्नागिरी ते मुंबई त्याचप्रमाणे २०१६ मध्ये मुंबई ते पुणे, व पुणे ते मुंबई अशा प्रकारे यशस्वी सायकल सवारी काढली आहे. सर्वात महत्त्वाची आणि अविस्मरणीय काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकल सफारी २१ विद्यार्थिनींनी २०१९ साली यशस्वीपणे पार पडली होती.

२१ विद्यार्थिनी १३ जानेवारी रोजी मुंबईतून गुवाहाटी येथे रवाना होणार आहे. यावेळी अतिरिक्त महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य आशा मेनन यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button