गृहनिर्माण क्षेत्र : राज्यात झाली महागृहप्रकल्प पूर्ती! | पुढारी

गृहनिर्माण क्षेत्र : राज्यात झाली महागृहप्रकल्प पूर्ती!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथोरिटीकडे (महारेरा) झालेल्या नोंदीनुसार 2023 मध्ये राज्यात तब्बल 3,927 गृहप्रकल्प पूर्ण झाले आहेत. रेराची नोंदणी सुरू झाल्यानंतर प्रथमच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. यातील 2,924 प्रकल्प मुंबई आणि पुणे विभागांतील आहेत.

कोविड-19 नंतर गेल्या दोन वर्षांपासून गृहनिर्माण क्षेत्रात वाढ पाहायला मिळत आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी 2023 वर्ष खास ठरले आहे. गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक गृहप्रकल्प याच वर्षात उभारले गेले आहे. 2022 च्या वर्षात 1 हजार 749 घरांची उभारणी झाली होती. त्याहून अडीचपट घरे गेल्या वर्षी उभारण्यात आली आहेत. कोविडमुळे बांधकाम रखडल्याने 2020 नंतर बांधकाम सुरू झालेल्या प्रकल्पांना फटका बसला होता. 2022 मध्ये 1749 प्रकल्प पूर्ण झाले. त्यातील 780 प्रकल्प कोकण, 583 पुणे, 210 नाशिक, 74 नागपूर, संभाजीनगरमधील 73, अमरावतीतील 26 आणि तीन प्रकल्प दादरा नगर हवेली येथील आहेत. गेल्या कॅलेंडर वर्षात महारेरा कार्यरत झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांची उभारणी झाली.

2023 मधील विभागनिहाय प्रकल्प

राज्यात कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील सर्वाधिक 1 हजार 552 प्रकल्प पूर्ण झाले.
खालोखाल पुणे विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीतील 1 हजार 372 गृहप्रकल्प पूर्ण झाले आहेत.
नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील 500 प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत.
नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांतील 318 प्रकल्प पूर्ण झाले.
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील 123 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममधील 56 आणि दमनमधील सहा प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

पूर्ण झालेल्या गृहप्रकल्पांची संख्या

2018……..1,595
2019……..2,232
2020……..2,573
2021……..2,326
2022……..1,749
2023……..3,927

Back to top button