कमला नेहरू रुग्णालयात तीन नवीन वॉर्ड सुरू | पुढारी

कमला नेहरू रुग्णालयात तीन नवीन वॉर्ड सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतर्फे कमला नेहरू रुग्णालयाचे नूतनीकरण हाती घेण्यात आले आहे. रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर पुरुष मेडिसीन वॉर्ड, महिला मेडिसीन वॉर्ड आणि आपत्कालीन वॉर्ड असे तीन नवे वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. कमला नेहरू रुग्णालयाची क्षमता 400 खाटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयाची क्षमता 300 खाटांची होती. त्यामध्ये 100 खाटांची भर घातली आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. सेप्सिस प्रक्रियेसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित केले जाईल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार म्हणाले, ‘आतापर्यंत एकाच वॉर्डमध्ये उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियासाठी रुग्णांना दाखल केले जात होते, आता, अतिरिक्त विभाग सुरू करण्यात आल्याने अधिकाधिक रुग्णांना आरोग्यसेवा देता येऊ शकेल. रुग्णालयात अतिरिक्त आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 15 परिचारिका आणि आठ वर्ग चार कर्मचार्‍यांचा समावेश आहे.’
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूरज वाणी म्हणाले, ‘ससून जनरल हॉस्पिटलनंतर शहरात जास्त क्षमतेचे कमला नेहरू रुग्णालय शहरातील एकमेव सार्वजनिक रुग्णालय आहे. आता आमच्याकडे स्वतंत्र औषध वॉर्ड आणि आपत्कालीन वैद्यकीय वॉर्ड सुरू केला आहे.’

हेही वाचा

Back to top button