Ajit Pawar : ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार

Ajit Pawar : ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. त्याकरिता ज्येष्ठांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांना लगावला. संधी मिळत नसल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेत वेगळा मार्ग निवडल्याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी केला.

नाशिकमध्ये गुरुवारी (दि. ४) एका कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, राज्यापुढे अनेक समस्या आहेत. कृषी, औद्याेगिक, सहकार अशा विविध क्षेत्रांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. या प्रश्नांवर ताेडगा काढत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांप्रति आम्हाला आस्था असून, तो जगला पाहिजे, टिकला पाहिजे तसेच पुढे गेला पाहिजे यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. आजच्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. सरतेशेवटी महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी शासन म्हणून आमचे कर्तव्य असल्याची भावना पवार यांनी बोलून दाखविली. गेली ३० ते ३५ वर्षे राजकारण करताना वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी आता नवीन पिढीला आशीर्वाद दिला पाहिजे, असा टोमणादेखील उपमुख्यमंत्र्यांनी खा. पवारांंना लगावला.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, सोयी-सुविधा, औद्याेगिक विकास तसेच राेजगारनिर्मितीसाठी शासन विविध योजना राबवित आहेत. त्यासोबत राज्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी दर पंधरवड्याला आढावा घेत असल्याचे पवार म्हणाले. देशात महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेताना नाशिकसह राज्यातील जनतेचा आनंदाचा इन्डेक्स वाढविणे हाच आपला उद्देश आहे. त्यादृष्टीने काम करत असून, ते यापुढेही सुरूच राहील, अशी ग्वाहीदेखील पवार यांनी दिली.

नाशिककरांचे नियोजन उत्तम

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी देशातून नाशिकची निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. या महोत्सवामध्ये देशभरातून आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. उद‌्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. नाशिककरांनी यापूर्वी अनेक उपक्रमांमध्ये चांगले नियोजन केले आहे. युवा महोत्सवानिमित्ताने आणखीन एक संधी उपलब्ध झाल्याचे सांगत सोहळ्याच्या आयोजनावर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे पवार यांंनी स्पष्ट केले.

आयोजकांची कानउघडणी

कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेतील शिक्षकांनंतर पहिल्यांदाच कार्यक्रमांच्या आयोजकांनी उठाबशा काढायला लावल्याचे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. माझे सोडा पण व्यासपीठावर मंत्री भुजबळांसारखे ज्येष्ठ बसले असून, त्यांची तरी काळजी घ्या, अशा शब्दांत आयोजकांची कानउघडणी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news