भारतात वाघांचे अस्तित्व तब्बल 25 हजार वर्षांपूर्वीचे.. | पुढारी

भारतात वाघांचे अस्तित्व तब्बल 25 हजार वर्षांपूर्वीचे..

आशिष देशमुख

पुणे : पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या शास्त्रज्ञांना लातूर जिल्ह्यातील हारवाडी गावात वाघाचे तब्बल 25 हजार वर्षांपूर्वी गाडले गेलेले पुढच्या पायाचे हाड सापडले. त्यावरून भारतात वाघांचे अस्तित्व 12 हजार नव्हे, तर 25 हजार वर्षांपूर्वीचे आहे, याचे पुरावेच शास्त्रज्ञांना सापडले असून, त्यांच्या डीएनएमध्ये नेमका काय बदल झाला आहे, यावर सखोल संशोधन सुरू आहे. आजवर झालेल्या संशोधनानुसार भारतात वाघांचे अस्तित्व हे 12 हजार वर्षांपासूनचे आहे, असे मानले जाते.

त्यापूर्वी आजवर कुठेही वाघांचे जीवाश्म सापडले नव्हते. मात्र, 2016 मध्ये डेक्कन कॉलेजमधील सेवानिवृत्त प्रा. डॉ. विजय साठे यांनी केलेल्या उत्खननात हे हाड सापडले आहे. त्यांनी ते हाड पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या प्रयोगशाळेत आणले. हे हाड वाघ, सिंह किंवा बिबट्याचे आहे काय यावर संशोधन केले. मुंबई, कोलकाता येथील वाघांच्या संशोधन संस्थांशी संपर्क केला. त्यांना हे नमुने दाखवले. तेव्हा असे लक्षात आले की, हे हाड वाघाचेच आहे. अन् तेही 25 हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे भारतात वाघांचे अस्तित्व 25 हजार वर्षांपूर्वी होते. याला दुजोरा मिळाला आहे.

मराठवाड्यातील अधिवासाचे दाखलेच नाहीत..

भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायरची स्थापना केली. तेव्हापासून वाघांच्या संवर्धनावर सरकार काम करीत आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सध्या भारतात 3 हजार 167 वाघ आहेत. भारतातील 2.3 टक्के भू-भागातच वाघ आढळतो. यात प्रामुख्याने शिवालिक-गंगेचे मैदान, मध्य भारत-पूर्व घाट, पश्चिम घाट, ईशान्य टेकड्या, ब्रह्मपुत्रा पूरमैदाने, सुंदरबन या पाच भागांचा समावेश आहे. मात्र, मराठवाड्यात कधीकाळी वाघ होते याचे पुरावे नाहीत. त्यामुळे डेक्कन कॉलेजने केलेल्या या संशोधनामुळे भारतातील वाघांच्या अधिवासाला नवी कलाटणी मिळणार आहे.

उंची, लांबीच्या फरकावरही संशोधन

डेक्कन कॉलेजमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतीक चक्रवर्ती या विषयावर पुढचे संशोधन करीत आहेत. या हाडांचे वय तर समजले, पण वाघांची उंची, लांबी, वजन यात इतक्या वर्षांत काही फरक झाला आहे काय, वाघांच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आहे काय, यावर ते सखोल संशोधन करीत आहेत.

हे आहे खुब्याचे हाड

प्रा. डॉ. साठे म्हणाले, हे हाड वाघाच्या पुढच्या पायाचे आहे. ते खुब्यापर्यंत लांबीचे आहे. ते पुढच्या पायाचे असून, त्यावरून त्या काळातील वाघांचा आहार, लांबी, उंची आणि वजन कळणार आहे. त्यावर भारतातील वाघांच्या जिवाश्म संशोधन संस्थांची मदत घेतली जात आहे. सोसायटी ऑफ अनॉटॉमीचीही मदत या कामी घेतली जात असून, यावर किमान चार ते पाच वर्षे संशोधन करावे लागणार आहे.

आपल्या देशात वाघांचे अस्तित्व 12 हजार वर्षापूर्वीचे आहे, असे मानले जात होते. मात्र लातूर जिल्ह्यातील हारवाडी गावात सापडलेल्या वाघांच्या जिवाश्मांमुळे असे कळते की, भारतात वाघांचे अस्तित्व 25 हजार वर्षांपेक्षाही जुने आहे. त्यावर आता सखोल संशोधन सुरू झाले असून, यातून बर्‍याच नव्या बाबी समोर येतील अशी आशा आहे.

-डॉ. विजय साठे, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पुणे

भारतात 25 हजार वर्षांपूर्वी वाघ होते. याचा पुरावा प्रथमच सापडला आहे. मराठवाड्यात वाघ होते याचा हा स्पष्ट पुरावा आहे. वाघांचे वजन, लांबी, रुंदी, त्यांच्या जबड्याच्या आकारात आता काही बदल झाला आहे का यावर आम्ही सखोल संशोधन सुरू केले आहे. अजून चार वर्षे हे संशोधन सुरू राहणार आहे.

-डॉ. प्रतीक चक्रवर्ती, संशोधक,डेक्कन कॉलेज, पुणे

हेही वाचा

Back to top button