Pimpri News : खरेदीखत होताच मिळकतीवर नाव | पुढारी

Pimpri News : खरेदीखत होताच मिळकतीवर नाव

मिलिंद कांबळे

पिंपरी : शहरातील सहा लाख निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. तर, तब्बल दोन लाख मिळकतींची नोंदच नसल्याचा अंदाज आहे. नोंद नसल्याने महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात खरेदीखत झाल्यानंतर तात्काळ मिळकतीस खरेदीदाराचे नाव लागणार आहे. त्यामुळे मिळकती नोंदणी व हस्तांतरणासाठी कराव्या लागणार्‍या धावपळीतून तसेच, विलंब दंडातून सुटका होणार आहे. खरेदीदाराचे नाव लागल्याने महापालिकेच्या तिजोरीत कराद्वारे भरणा वाढणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. एमआयडीसीतील बंद कंपन्यांच्या जागेवरही गृहप्रकल्प उभे राहत आहेत. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. नोंदवलेल्या 6 लाख 10 हजार मिळकतधारकांकडून महापालिका मिळकतकर वसुल करते. दुसरीकडे, शहरात दोन लाखांपेक्षा अधिक मिळकतींची नोंदच नसल्याचा अंदाज आहे. कर चुकविण्यासाठी काही जण मिळकतींची नोंदच करत नाहीत. पालिकेचे दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न बुडते. ते भरून न येणारे उत्पन्न आहे.

नुकसान रोखण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क (रजिस्ट व स्टॅप ड्युटी) विभागाकडे खरेदीखत दस्त नोंद झाल्यानंतर तात्काळ करसंकलन कार्यालयाकडे त्या मिळकती होणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि करसंकलन विभागाची संगणक प्रणाली एकमेकांना जोडण्यात आल्याने दस्त झाल्या झाल्या कर संकलन विभागाच्या रजिस्टरमध्ये त्या खरेदीदाराच्या नावाने मिळकतीची नोंद होईल. या नोंदणीस मुंबईनंतर पनवेल महापालिकेने सुरुवात केली आहे. डिसेंबर महिन्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत ही प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे.

त्रासातून होणार नागरिकांची सुटका

खरेदी केलेली सदनिका, रो हाऊन व मोकळी जागा या मिळकतीचे नोंदणी किंवा हस्तांतरणासाठी नागरिक टाळाटाळ करतात. कर संकलन कार्यालयाच्या चकरा मारणे, शुल्क भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मिळकत नोंदणी व हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असूनही त्याकडे कानाडोळा केला जातो. नोंदणीसाठी कर संकलन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. थकबाकीसह मूळ मिळकतकर भरल्यानंतर एन.ओ.सी. घ्यावी लागते. त्यानंतर मिळकतीच्या रेडिरेकरनुसार अर्धा टक्का शुल्क भरल्यानंतर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होऊन खरेदीदाराचे नाव लागते. त्यात मोठी आर्थिक झळ बसते. तसेच, कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. नव्या पद्धतीमुळे हा त्रास वाचणार आहे.

डिसेंबरपासून नोंदणीस सुरुवात होईल

मुद्रांक व नोंदणी विभागाकडे मिळकतीचे खरेदीखत दस्त नोंदणी झाल्यानंतर तात्काळ शहरातील मिळकतींवर खरेदीदाराचे नाव लागणार आहे. नवीन नावाने मिळकतकर बिल तयार होईल. खरेदीखताच्या रक्कमेवर अर्धा टक्का हस्तांतरण शुल्क बिलात समाविष्ट केले जाईल. त्यासाठी नोंदणी विभाग व कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत एपीआय इंटीग्रेशन झाले आहे. प्रत्यक्ष नोंदणी डिसेंबर 2023 पासून सुरुवात करण्याचे नियोजन आहे, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

मिळकत लपविता येणार नाही

काही जण मिळकतकर चुकविण्यासाठी अनेक वर्षे मिळकतीची नोंद करीत नाहीत. मिळकत लपविली जाते. नव्या प्रक्रियेमुळे खरेदी केलेली प्रत्येक मिळकत करसंकलन विभागाच्या रजिस्टरवर नोंदविली जाणार आहे. त्यामुळे खरेदीखत दस्त नोंदणी झालेली शहरातील एकही मिळकत महापालिकेपासून लपणार नाही.

ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू

मिळकतकर उत्पन्न बुडू नये म्हणून महापालिका ड्रोनद्वारे संपूर्ण शहरातील सर्व मिळकती व मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करीत आहेत. त्यात प्रत्येक मिळकतीचे अचूक मोजमाप घेतले जात असून, त्यांना नव्याने क्रमांक दिला जात आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख 72 मिळकतींना क्रमांक देण्यात आले आहेत.

हेही वाचा

Kasturi Club : तिमिरातूनी तेजाकडे; मंगलमय वातावरणात उजळले दीप

सोलापूर : मोटारसायकलला पिकअपची धडक; दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू

Pune News : जप्त केलेली वाहने अद्यापही ‘जैसे थे’

Back to top button