अनुदान मिळेना, शिवभोजन थाळी शिजेना! | पुढारी

अनुदान मिळेना, शिवभोजन थाळी शिजेना!

समीर सय्यद

पुणे : कोरोना काळात गरीब व गरजू नागरिकांना सुरुवातीला मोफत आणि त्यानंतर केवळ दहा रुपयांत जेवण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘शिवभोजन थाळी’ योजना सुरू केली. मात्र, हे सरकार बदलल्यानंतर शहर- पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील 51 केंद्रे बंद झाली आहेत. तर 15 ऑगस्टपासून अनुदान मिळालेले नसल्याने केंद्रांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. थाळी मिळत नसल्याने गरजूंची परवड होत असून, केंद्रचालकही हवालदिल झाले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुढाकारातून 26 जानेवारी 2020 पासून गरजूंना केवळ दहा रुपयांत ‘शिवभोजन थाळी’तून जेवण देण्यात येत होते. कोरोना काळात केवळ पाच रुपयांत शिवभोजन देण्यात येत होते. या योजनेला पुणे, पिंपरी -चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहर अन्नधान्य वितरण विभाग आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून शहरासह जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रे वाढविण्यात आली. महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 86 केंद्रे सुरू होती.

चार महिन्यांपासून अनुदानच नाही
शिवभोजन केंद्रचालकांना शासनाकडून अनुदान मंजूर केले जाते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळलेले नाही. त्यामुळे केंद्र चालवताना दमछाक होते. अनुदान वेळेत मिळाल्यास चांगले होईल, अशी प्रतिक्रिया एका शिवभोजन थाळी केंद्रचालकाने दिली.

का करण्यात आली कारवाई ?
केंद्रांवर शिवभोजन थाळी पार्सलद्वारे वितरित केल्या जात होत्या. तसेच वेळेच्या आतच थाळ्या वितरित होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी आठ ते दहा केंद्रचालकांच्या सुनावण्या घेतल्या. त्यामध्ये केंद्रांवरील मोबाईल अ‍ॅप आणि सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात एकाच लाभार्थ्याचे वारंवार छायाचित्र दाखवून थाळी वितरण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्यात आले.

दहा रुपयांना साधा वडापावही येत नाही. अशा परिस्थितीत केवळ दहा रुपयांत जेवण मिळतं. मीच नाही, तर माझ्यासारख्या अनेकांचा पोटाचा प्रश्न सुटला.
                                                                 – विजय गायकवाड, लाभार्थी.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 35 केंद्रे सुरू
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एकूण 35 केंद्रे असून, त्यामध्ये 75 ते 175 थाळीपर्यंत मर्यादा आहे. सुरू असलेल्या केंद्रांतून तीन हजार 875 थाळींचे वितरण केले जात आहे.

अधिकारी सुटीवर…
पुणे शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रचालकांना 15 ऑगस्टपर्यंचे अनुदान वितरित करण्यात आले आहेत. त्यानंतर शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे वेळेत मिळालेले नाही. मात्र, आता अनुदान प्राप्त झाले असून, अन्नधान्य वितरण अधिकारी सुटीवरून आल्यानंतर हे अनुदान वितरित केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button