Pune News : पैशावर निवडून येणारे गावचा विकास काय साधणार? | पुढारी

Pune News : पैशावर निवडून येणारे गावचा विकास काय साधणार?

राजेंद्र खोमणे

नानगाव : कोणत्याही निवडणुका म्हटल्या की पैसा, दारू, मटण, जेवणावळ्या हा पॅटर्न आता नित्याचा बनला आहे. त्यामुळे नेत्यांनादेखील माहिती झाले आहे की पाच वर्षे विकासकामे करण्यापेक्षा निवडणुकीत या सगळ्या गोष्टी केल्या की सगळं कसं ’ओके’ होते. त्यामुळे पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकणार्‍यांना गावच्या विकासाचं काय पडलंय, त्यामुळे अशी मंडळी गावचा सामाजिक विकास काय साधणार ? त्यापेक्षाही मतांचा अधिकार विकणारा मतदार हा गावच्या विकासात धोक्याचा घटक बनत चालला असल्याचे सुज्ञ मतदार रोखठोक प्रश्न उपस्थित करत असून, गावागावांत चर्चांना उधाण येत आहे.

नुकत्याच दौंंड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. गावचा कारभारी होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने तयारी केली होती. या निवडणुकीत छोट्या व मोठ्या गावांचाही सामावेश होता. गावात आपली सत्ता असावी, यासाठी इच्छुक गावनेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. कितीही पैसा खर्च करण्याची तयारी ठेवत मागील दोन-तीन महिन्यांपासून गावात मतदारराजाच्या अडचणी सोडवण्यासाठी तयारी सुरू झाली होती. त्यामुळे निवडणुकीचे बिगुल वाजले की ’होऊ द्या खर्च’ हे समीकरण मतदारांच्या डोक्यात फिट्ट बसले होते.

निवडणूक काळात तालुक्यातील महत्त्वाच्या व मोठ्या समजल्या जाणार्‍या गावात तर अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याची चर्चा सुरू आहे. लाखांचे आकडे कधी कोटींवर पोहोचले, हे लक्षातदेखील आले नाही. मतदारराजाला खूश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दारू आणि मटणाच्या पिशव्या घरपोच केल्या जात होत्या, हे चित्र सुज्ञ मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. मात्र, निवडणुकीची नशा ज्यांच्या डोक्यात शिरली, असे नेते व मतदार यांना सांगितले तरी ते कुठं कोणाचं ऐकणार, असेही सुज्ञ मतदार बोलून दाखवत आहे.

यंदाच्या निवडणुका बरोबर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आल्याने दिवाळीचे आगोदरचे काही दिवस मतदारांना तिखट खाण्याचे व पिण्याचे गेले, तर दिवाळीनंतर दिवाळी गोड झाली, मात्र पुढील काळात गावाचा विकास किती खुंटणार आणि सामाजिक विकासासाठी आपण कितपत बोलणार, हे प्रश्न आता कोण विचारणार ? निवडणूक काळात गावात दारू आली आणि गावातील काही तरुणांची त्यामध्ये भर पडली, त्यामुळे गावाचा सामाजिक विकास किती पटीने मागे आला, याचे उत्तर कोणाकडे आहे का ?असा संतप्त सवाल देखील विचारला जात आहे.

हेही वाचा

Pune News : शरद पवारांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

Pune News : द्राक्षबागेची खा. सुळेंकडून पाहणी

सिंधुदुर्ग : मंत्री केसरकरांनी सावंतवाडीकरांना प्रत्यक्ष भेटून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Back to top button