आमची लढाई वैचारिक, वैयक्तिक नव्हे : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

आमची लढाई वैचारिक, वैयक्तिक नव्हे : खासदार सुप्रिया सुळे

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात कार्यक्रमात शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार व अन्य कुटुंबीय एकत्र आले. यासंबंधी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. नाती एका जागेवर आणि राजकीय भूमिका एका जागेवर. आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही या शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. खा. सुळे म्हणाल्या, भाजपातील अटलबिहारी वाजपेयींचे कुटुंब, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अरुण जेटली या कुटुंबीयांशी पवार कुटुंबाचे वैयक्तिक संबंध आहेत.

या कुटुंबीयांमधील कोणत्याही कार्यासाठी पवार कुटुंबीयांना बोलावले तर आम्ही नक्की जातो. राजकीय मतभेद जरूर आहेत. परंतु व्यक्तिगत कोणत्याही कुटुंबाशी मतभेद नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी त्यांनी माहिती दिली. पवार यांची प्रकृती स्थिर आहे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद, बारामतीसह राज्यातील, देशातील मायबाप जनता हेच पवार यांचे टॉनिक आहे, असे त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत कार्यक्रमाला एकत्र आल्यानंतर काही चर्चा झाली का, दिवाळी गिफ्ट मिळाले का, अशी विचारणा केली असता अजून तरी गिफ्ट आलेले नाही. अजित पवार यांनाच विचारावे लागेल, अशी मिश्कील टिप्पण्णी त्यांनी केली.

हा तर आरोप करणार्‍यांचा बालिशपणा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शाळेच्या दाखल्यासंबंधी काही लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी विचारणा केली असता खासदार सुळे म्हणाल्या, पवार हे जेव्हा दहावीला होते तेव्हाचा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? हे सगळे हास्यास्पद सुरू आहे. पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी हा बालिशपणा सुरू आहे. आज-काल खोटी सर्टीफिकेट ही मार्केटमध्ये मोठी गोष्ट झाली असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

हेही वाचा :

Back to top button