Pune News : गल्लोगल्ली फिरून शिक्षकांनी आणले मुलांना शाळेत! | पुढारी

Pune News : गल्लोगल्ली फिरून शिक्षकांनी आणले मुलांना शाळेत!

संतोष निंबाळकर

विश्रांतवाडी : सरकारने आठवीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे करून अनेक वर्षे उलटली, तरी भटक्या-विमुक्तांची हजारो मुले आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याची विदारक स्थिती आहे. मात्र, विश्रांतवाडीतील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ शाळेची (क्रमांक 118 मुलांची व 84 मुलींची) पटसंख्या कर्तव्यदक्ष प्रभारी मुख्याध्यापक व शिक्षिकांमुळे 114ने वाढली असून, ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

महापालिकेच्या गाडगीळ शाळेची पटसंख्या जूनमध्ये केवळ 128 होती. प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी घेतल्यानंतर नितीन वाणी यांनी सहकारी शिक्षकांची मदत घेऊन गल्लोगल्ली फिरून खेळणी व इतर साहित्याचा व्यवसाय करणारे, तसेच पोतराज यांचे समुपदेशन करून त्यांच्या मुलांचा शाळेतील प्रवेश निश्चित केला. विद्यार्थी शोधमोहीम चालू असताना नगर रस्त्यावरील रामवाडी येथे पोतराजांची अनेक मुले शाळेत जात नसल्याची माहिती वाणी यांना मिळाली. त्यांनी शाळेतील दीपाली घाडगे, मृणालिनी भागवत, सुनीता जाधव, आशा उंडे, स्वाती लोहकरे, सुरेखा खैरे व प्रदीप गवळी आदी शिक्षकांना सोबत घेतले. रामवाडी येथे या मुलांच्या पालकांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

यानंतर या पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत 58 मुलांना शाळेत दाखल केले. यातील 34 विद्यार्थी शाळेत पहिल्यांदाच दाखल होत आहेत. बाकी विद्यार्थी शाळाबाह्य होते. कलवड वस्ती व धानोरीतील फेरीवाल्यांची 11 मुले नव्यानेच शाळेत आली आहेत. विश्रांतवाडी परिसरातून अनेक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केल्याची माहिती वाणी यांनी दिली. नव्याने दाखल झालेल्या 114 पैकी 29 विद्यार्थ्यांचे आधार कार्डच नाही.

ससून हॉस्पिटलमधून वयाचा दाखला मिळतो. पण, त्यावर जन्मतारीख नसल्याने आधार कार्ड बनवता येत नाही. आधार कार्ड नसले तरी केंद्र सरकारच्या युडायस (णऊखडए) व राज्य सरकारच्या सरल पोर्टलवर नोंदणी होते. मात्र, शासन नियमाप्रमाणे संच मान्यता न मिळाल्याने शिक्षक वाढवून मिळत नाहीत. महापालिकेने या मुलांचे आधार कार्ड बनविण्यासाठी मदत केली पाहिजे, असेही वाणी
यांनी सांगितले.

तुम्ही देणार का चारशे रुपये?

रस्तोरस्ती सिग्नलवर थांबून अंगावर चाबकाचे आसूड ओढून पोजराज पालकांना मुलांकडून दिवसाला 300 ते 400 रुपये कमाई होते. या मुलांना शिकवा, त्यांना शाळेत पाठवा, असे आवाहन मुख्याध्यापक वाणी व शिक्षकांनी या पालकांना कले. मात्र, आमची मुले शाळेत पाठवल्यावर तुम्ही देणार का आम्हाला चारशे रुपये?, असा सवालही या पालकांनी केल्याचे या शिक्षकांनी सांगितले.

शिक्षक काढतात वर्गणी

गाडगीळ शाळेतील बालवाडीत 38 बालक असूनही महापालिकेने अद्याप त्यांना शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती केली नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी एका सेविकेची तात्पुरती व्यवस्था केली आहे. या सेविकेला महिन्याला साडेतीन हजार रुपयांचे मानधन दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतूक शुल्कापोटी मिळणारी बिले गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेकडून मिळत नाहीत. त्यामुळे शिक्षकच वर्गणीतून प्रतिविद्यार्थी 500 रुपये शुल्क महिन्याला वाहतूकदारांना देतात. महापालिकेकडून सध्या प्रतिविद्यार्थी फक्त 300 रुपये मिळत असल्याचे नितीन वाणी यांनी सांगितले.

ही मुले भाषेमध्ये कमी असली, तरी ती चुणचुणीत असून, त्यांचे व्यवहार ज्ञान अतिशय चांगले आहे. त्यांना हिशेब चांगल्याप्रकारे करता येतो.

– स्वाती लोहकरे, शिक्षिका

या शाळेत बालवाडीसाठी सेविकेची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. आधार कार्डसंदर्भात निर्देश दिले आहेत. विद्यार्थी वाहतूक करणार्‍यांना लवकरच वाहतुकीचे शुल्क देण्यात येईल.

– संजयकुमार राठोड, प्रभारी प्रशासकीय अधिकारी, महापालिका.

हेही वाचा

Back to top button