Market News : कांदा, हिरवी मिरची, वांगी स्वस्त | पुढारी

Market News : कांदा, हिरवी मिरची, वांगी स्वस्त

शंकर कवडे

पुणे : नव्या हंगामातील कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढला आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कांद्याचा भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या प्रतीकिलोला 30 ते 40 रुपये तर किरकोळ बाजारात 50 ते 90 रुपये दर मिळत आहे.

राज्यासह परराज्यातून आवक वाढल्याने हिरवी मिरचीसह ढोबळी मिरची व वांगीचे दर उतरले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील श्रीछत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये रविवारी 100 ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दहा ट्रकने वाढली. बाजारात कांदा, हिरवी मिरची, वांगी व ढोबळी मिरची वगळता बहुतांश फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने टिकून होते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक येथून हिरवी मिरची 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, इंदौर येथून 2 टेम्पो गाजर, बेळगाव येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून 1 ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 10 टेम्पो आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8 ते 10 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 8 ते 10 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 4 ते 5 टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे 100 ते 125 गोणी, पावटा 2 टेम्पो, मटार 15 ते 20 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 ट्रक आवक झाल्याची माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

मेथी, करडई, पुदीना, राजगिरा, पालकचे भाव उतरले
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड घाऊक बाजारात रविवारी (दि. 5) कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 80 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर राहिली, तर मेथीची आवक 30 हजार जुड्यांनी वाढली. मागणीच्या

तुलनेत आवक जास्त राहिल्याने किरकोळ
बाजारात मेथीच्या गड्डीमागे दहा रुपयांनी, तर करडई, पुदीना, राजगिरा व पालकच्या भावात गड्डीमागे पाच रुपयांनी घसरण झाली. तर, कोथिंबिरीच्या भावात पाच रुपयांनी वाढ झाली. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर राहीले. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीला 4 ते 18 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात एका गड्डीची 5 ते 30 रुपयांना विक्री करण्यात येत होती.

 

Back to top button